Mumbai : कोणतीही कपात, विलंब न करता पोलिसांचे वेतन तात्काळ द्या; माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या लढाईत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांचे विशेषतः महिला पोलिसांचे वेतन विना कपात आणि विनाविलंब तात्काळ द्यावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या लढाईत पोलीस यंत्रणा महत्वाचे काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस कर्मचारी विशेषतः महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन कपात केले जाणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु अद्याप पर्यंत पोलिसांना त्यांचे वेतन मिळालेले नाही. पोलीस दलाकडून ट्रेझरीकडे पाठवण्यात आलेली बिले 25 टक्के कपात करून पाठविण्यात आली आहेत.

कोरोना विषाणूच्या लढ्यात पोलीस आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. दिवस रात्र काम करणाऱ्या पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होणार नाही, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणताही विलंब अथवा कपात न करता पोलिसांचे वेतन तातडीने देण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.