Vaccination News : लसीकरणात महाराष्ट्राची मोठी झेप, दहा कोटी नागरिकांचे लसीकरण

एमपीसी न्यूज – राज्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाने आज दहा कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारी चार वाजता राज्यात दहा कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले की, राज्यात एकूण 10 कोटी 01 लाख 27 हजार 581 लस मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 6 कोटी 80 लाख 53 हजार 077 जणांना लसीची पहिली मात्रा, तर दुसरी मात्रा 3 कोटी 20 लाख 74 हजार 504 जणांना देण्यात आल्या आहेत.

लसीकरणाच्या मोहिमेस गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले. त्यामुळेच हा टप्पा पार करता आला. राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून लसीकरण केले जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला 31 डिसेंबर 2021 पर्यंत लशीच्या दोन्ही मात्रा देण्याचे उद्दिष्ट आहे, असे टोपे यांनी सांगितले.

राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेस 16 जानेवारीला सुरुवात झाली होती. प्रथम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येऊ लागले. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल, मिशन युवा स्वास्थ्य अशी अभियान राबविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.