Pimpri : कच-यापासून इंधन, वीज, खत निर्मिती अन्‌ बरेच काही

महापालिकेतर्फे ऑटो क्‍लस्टरमध्ये प्रदर्शन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या सोसायट्या, हॉटेल्स, उद्योगांचा ओला कचरा न उचलण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे या कचऱ्याचे विघटन करायचे कसे, कचरा जिरवायचा कसा आणि कुठे असे अनेक प्रश्‍न शहरवासियांना भेडसावत आहेत. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरमध्ये भरलेल्या कचरा विलगीकरण व खत निर्मिती प्रदर्शनातून मिळत आहेत.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने व युनीट्रॅक सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तीन दिवसीय प्रदर्शनाला आजपासून (शुक्रवार) सुरुवात झाली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्‌घाटन सत्र रद्द करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरीक्त आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी यांनी प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनामध्ये घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या 50 नामांकित संस्था सहभागी झाल्या आहेत. कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जागरुकता वाढवणे आणि नागरिक, व्यावसायिक, मोठ्या सोसायट्या यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचा पुर्नवापर कसा करावा याबाबतची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे.

घरात दररोज तयार होणा-या कच-याचे जैविक खतात कसे रुपांतर करावे आणि स्वच्छतेबाबत प्रत्येक नागरिकाची असलेली जबाबदारी आणि कर्तव्य याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जात आहे. आपले घर, आपली सोसायटी आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण तसेच कच-यावर प्रक्रिया करण्यासंदर्भातील अद्ययावत यंत्र सामुग्रीबाबत माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरवासियांना दिली जात आहे.

प्रदर्शनामध्ये विश्‍वदीप प्रेसपार्ट प्रा. लि. यांचा कचऱ्यापासून हरीत उर्जा निर्मितीचा प्रकल्प लक्षवेधी ठरला आहे. कचरा टाकण्याची एक टाकी आणि गॅस साठवण्याचा फुगा याच्या मदतीने स्वयंपाकाचा गॅस निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान नागरिकांना आचंबित करत आहे. वीज अथवा कोणत्याही बाह्य स्त्रोताचा वापर न करता केवळ कचऱ्यापासून गॅस निर्मितीमुळे गॅस सिलिंडरच्या किंमती कितीही वाढल्या तरी त्याची चिंता करण्याची आवश्‍यकता नाही. यामुळे कच-याच्या विल्हेवाटीबरोबरच गॅस उपलब्ध होत असल्याने त्यावरील खर्चातही बचत होत आहे.

डेली डंप या संस्थेने मातीच्या आकर्षक भांड्यांची उतरंड रचून त्यात ओला कचरा टाकून त्यातून खत निर्मितीचा अनोखा प्रकल्प प्रदर्शनात सादर केला आहे. ही मातीची भांडी शो पिस सारखी दिसतात. कोको पीठ, वर्तमान पत्र आणि किचन वेस्टच्या सहाय्याने कंपोस्ट खत तयार करण्याची ही सुलभ पध्दत नागरिकांना आचंबित करत आहे. अवघ्या साडेतीन हजार रुपयामध्ये घरातल्या घरात कचरा जिरवून त्यापासून खत निर्मिती करण्याच्या या पध्दतीत कचऱ्याचा कोणताही दुर्गध घरात येत नाही. उलट या मातीच्या भांड्यांवर वारली चित्र अथवा अन्य कोणतीही कलाकुसर करुन घराचा एक कोपरा सुशोभित करु शकतो. शिवाय हा प्रकल्प मेटेनन्स फ्री असल्याची माहिती डेली डंप संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुनम कस्तुरी व प्रज्ञा आलाटे यांनी दिली.

या प्रदर्शनामध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी घनकच-यावर प्रक्रिया करणा-या मशिनरी सादर केल्या आहेत. यामध्ये 5 किलोपासून ते 100 टनापर्यंतच्या कच-याचे विघटन, खत निर्मिती करणा-या मशिनरी नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत. विविध कंपन्यांनी कचरा विघटनाचे हायटेक तंत्रज्ञान सादर केले आहे. तसेच आकुर्डी येथील इनव्हीकेअर टेक्‍नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचा मैलाशुध्दीकरण प्रकल्प चर्चेचा विषय ठरला आहे. शिवाजीनगर येथील उर्जा बायो सिस्टीम प्रा. लि. कंपनीचा कच-यापासून बायोगॅस व वीज निर्मितीचा प्रकल्प पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

संजीवनी ओला कचरा जिरवणारी पिशवी प्रदर्शनातील कुतुहलाचा विषय ठरला आहे. या पिशवीमध्ये किचन वेस्ट टाकून त्यापासून कंपोस्ट खत तयार होते. अवघ्या बाराशे रुपयांना मिळणारी ही पिशवी सहा महिन्यांचा कचरा साचवते. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येणार नाही, याची दक्षता पिशवीच्या रचनेत करण्यात आली आहे. प्लास्टिकला पर्याय म्हणून बेंगलोर येथील प्लास्टो मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनीने मक्‍याच्या कणसापासून प्लास्टिकसारखी दिसणारी पिशवी तयार केली आहे. देशभरात या कंपनीकडून प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा केला जातो.

मुंबईतील आरयुआर ग्रीन लाईफ या संस्थेने कच-यातील कागदांपासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे सादरीकरण केले आहे. कागदी कच-यावर प्रक्रिया करुन त्यापासून पेन्सिल, वह्या, पेन स्टॅंड, फ्रेम, विविध भेटवस्तू तयार केल्या आहेत. तसेच इतर घनकच-यापासून फिनाईल तयार केले आहे. 80 टक्के कचऱ्याचा पुनर्वापर करुन विविध वस्तू तयार करणे शक्‍य आहे. त्यामुळे कच-याच्या समस्येबरोबरच वृक्षतोड कमी होण्यास मदत असल्याचा दावा या संस्थेने केला आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, नागरिक, व्यापारी संस्था, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच बचतगटांनी गर्दी केली होती. 19 ऑगस्ट अखेर हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. प्रदर्शन निःशुल्क असून या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.