Manobodh by Priya Shende Part 11 : मनोबोध भाग 11 – जनी सर्व सुखी असा कोण आहे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक अकरा.

जनी सर्व सुखी असा कोण आहे

विचारे मना तुच शोधूनी पाहे

मना त्वां चि रे पूर्व संचित केले

तयासारिखे भोगणे प्राप्त झाले

 

समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक इतके प्रसिद्ध आहेत की, त्यातली काही वाक्य ही, रोजच्या बोलीमध्ये वाक्प्रचार म्हणून आजही सहज वापरली जातात.

त्यातलंच हे चरण, “जनी सर्व सुखी असा कोण आहे”. खरंच आपण जर विचार केला तर, आपल्या लक्षात येतं की, जगात खरंच कोणी सुखी नाही.

आपल्याला फक्त आपलं दुःख कळतं, क्लेश, यातना कळतात. आपण आपल्या दुःखातूनच बाहेर पडत नाही. तर दुसऱ्याचं दुःख कळणार कसं?

जगात फक्त मला दुःख दिले आहे, बाकी सगळे सुखी आहेत. बाकी सर्वांकडे अलबेल आहे हा गैरसमज आहे. तसं वाटलं की आपण अजून जास्त दुःखी होतो.

आपल्याला दुसऱ्याचं दुःख कळत नाही. जगात जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मग ती किडा-मुंगी असो, प्राणी पक्षी असो, मनुष्य असो, कोणीही असू देत त्याला दुःख हे आहेच.

आपण दुसऱ्याच्या जवळ आस्थेने गेलो तर, आपल्याला हळूहळू त्यांचं ही दुःख कळतं. “दुनिया मे कितना गम है मेरा गम कितना कम है”, ही गोष्ट पटायला, आपल्याला त्रयस्थाची भूमिका घेऊन, खोल विचार करून, आपलं दुःख बाजूला सारून, दुसऱ्या मध्ये तेवढं एकरूप व्हावे लागते. म्हणजे त्याचा अनुभव येतो.

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपु आपल्यावर हावी होत असतात आणि एक एक दुःख आपण स्वतः ओढवून घेतो.

कोळी कसा आपल्याभोवती जाळं विणत जातो आणि स्वतःलाच त्यात अडकतो. अगदी तसंच हे दुःख, आपण गोळा करत राहतो. त्याचं एक स्वतःभोवती जाळं विणतो, आणि मी किती दुःखी आहे, हे सांगत फिरतो. प्रत्येकाला दुःख हे आहेच. म्हणून समर्थांनी संपूर्ण जगाला कायम लागू असणारे वाक्य, आधीच सांगून ठेवलं आहे की, “जगी सर्व सुखी असा कोण आहे”.

सुख ही संकल्पना प्रत्येकाची वेगळी आहे. जेवढी लोकं तेवढ्या वृत्ती. कोणाला कशात सुख वाटतं तर, कोणाला कशात.. प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी.

आपल्याकडे जे नाही त्याचं दुःख करत बसतो आपण. जे आहे त्यात सुख मानायचं नाही, कारण सतत माणसाला काही ना काहीतरी हवं असतं. त्याचा लोभ सुटतच नाही. काहीतरी हवं ही आकांक्षा माणसाला स्वस्थ जगु देत नाही. “ये दिल मांगे more” या मधेच गुरफटून जाऊन, आपण दुःखीकष्टी होत असतो. बारीक बारीक गोष्टींचा राग येतो, द्वेष निर्माण होतो, थोड्याशा बोलण्याने अपमान होतो, मनासारखं होत नाही, भलत्याच अपेक्षा बाळगतो. आणि या सगळ्या चिडचिडीचं मग दुःखाच्या डोंगरात रूपांतर होतं, जे आपण पेलत डोक्यावर घेऊन फिरत असतो. त्यामुळे माणूस कधीच सुखी होत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात की, हे मना हे तूच शोधून काढ, की या जगात सुखी कोण आहे. प्रेमाने जरा दुसऱ्यांच्या जवळ जा, त्याचे दुःख समजून घे, म्हणजे तुला कळेल की, प्रत्येक जण किती दुःखात आहे ते. आणि जगात सुखी कोणीच नाहीये.

यापुढे समर्थ म्हणताहेत, “मना त्वां ची रे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले”.

इथे परत कर्म योग आला. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. पूर्वसंचित म्हणजे माणसाने पूर्वी केलेले कर्म. आपल्या संस्कृतीत पूर्वजन्माची संकल्पना मान्य आहे. त्यानुसार पूर्वजन्मात केलेले कर्म त्याचे परिणाम त्याची फळं नंतर माणसाच्या सोबत येतात. कर्म चांगलं असेल तर सुख शांती येते. आणि कुकर्म केलं असेल तर त्याचे वाईट परिणाम भोगायला लागणार.

समर्थ मनाला सांगताहेत की, हे बाबा, तुझे काही सत्कर्म किंवा कुकर्म केला आहेस, आधीच्या जन्मात किंवा या जन्मात.. त्याचे भोग तुला भोगायला लागणार आहेत. त्यामुळे तू सत्कर्म करत रहा. जसं कर्म असेल तसा भोग असेल. तया सारिखे भोगणे प्राप्त झाले.

इथे मला राजा दशरथ त्याची कहाणी आठवते. राजा दशरथ याच्या हातून आज्ञाधारक श्रावण बाळाचा वध होतो. हे बघून त्याचे आई-वडील राजा दशरथाला शाप देतात की, तू पुत्र वियोगाने मरशील. आणि खरंच तसंच होतं रामाला वनवास घडतो, लक्ष्मण त्याच्या सोबत जातो आणि राजा दशरथाचा मृत्यू हा पुत्र वियोगाने होतो. चुकून झालेल्या कर्माचे फळसुद्धा भोगावाच लागतं.

म्हणूनच समर्थ मनाला उपदेश देत आहेत की, जगात कोणीही सुखी नाही, हे तुझं तूच शोधून काढ आणि आपल्या पूर्व कर्मानुसार आपल्याला भोगायला लागणार आहेत तर तू कायम सत्कर्मच कर.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.