Manobodh by Priya Shende Part 8 : मनोबोध भाग 8 – देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक आठ.

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी

मना सज्जना हेचि क्रिया धरावी

मना चंदनाचे परी त्वां झिजावे

परी अंतरी सज्जनां नीववावे

एक आदर्श जीवन शैली समर्थ माणसाला देत आहेत. अशा पद्धतीने जर माणूस वागला तर, त्याचा देहत्याग झाल्यावर सुद्धा, त्याचं नाव समाज आदरानेच घेईल.

मनुष्य जन्माला आला म्हणजे, त्याचा मृत्यू अटळ आहे. पण मग या मानवाचा जन्म मिळाल्यावर, एखाद्या किडा-मुंगी सारखं जगण्यापेक्षा, काहीतरी चांगलं कर्म करून, देहाचा त्याग झाला, तर बाकीचे तुमचा आदर्श घेत, नाव काढतील असं जगावं.

देहत्याग झाल्यावर, खरच काय उरतं त्या व्यक्तीचं.. तर त्यांने केलेले कर्म, त्याचे विचार, त्याने इतरांस दिलेली वागणूक, अनुभव. बाकी तर तो मनुष्य काही घेऊन जाणार नाहीये आणि काही देऊनही जाणार नाहीये. तर समर्थ म्हणत आहेत की तुम्ही जीवन कसे जगावे, तर चांगलं कर्म करून, तुमची कीर्ती मागे राहील असं जगा.

पुढे ते म्हणताहेत “मना सज्जना हेचि क्रिया धरावी”. आपलं मन सज्जन ठेवून कीर्ती उरेल, असं कर्म करा. समाजाने तुमचं नाव काढलं पाहिजे, असं कर्म करा. सतत चांगलं काम करा. फक्त संसारासाठी स्वार्थी कर्म न करता, आपल्या कर्माचा इतरांना आपण कसा फायदा होईल, ते कर्म करा. स्वतःसाठी तर सगळे जीवजंतू जगतात, पण मनुष्यजन्म मिळाला आहे तर सत्कर्म करा. ते कर्म कसे कराल तर, त्यासाठी समर्थ चंदनाची उपमा देत आहेत.

चंदनाचा गुणधर्म असा की ते, झिजल्याशिवाय त्याचा सुगंध दरवळत नाही. सुगंध हा त्याला निसर्गाने बहाल केल्या आहे, पण तो प्राप्त होतो ते झिजल्यानंतर. तसंच मन सज्जन ठेवून, सतत सत्कर्म करत राहिलं, दुसऱ्यांसाठी झिजून त्याला दरवळ देत राहिलात, तर मनुष्य नक्की किर्तीला पात्र ठरेल आणि त्याचं नाव कायम घेतलं जाईल.

पुढे समर्थ म्हणतात की, “परी अंतरी सज्जना नीववावे”. म्हणजेच हे कर्म करत असताना, चंदनासारखा झिजत असताना, स्वतःच्या मनात कायम सज्जनता प्रस्थापित कर, असा उपदेश समर्थ देत आहेत.

या चारही ओळी कशा एकमेकांना धरून आहेत, ते आपण पाहूयात. तेही शेवटच्या चरणांकडून पहिल्या चरणाकडे येऊ.

म्हणजे असं की, आपल्या मनात कायम सत् जन म्हणजेच चांगला भाव ठेवून, चांगल्या आचार-विचारांना प्रस्थापित करा. ते करण्यासाठी आपला देह हा झिजवावाच लागणार आहे. कष्टाशिवाय पर्याय नाहीये. कठोर परिश्रम करावे लागणार आहेत आणि त्यानेच आपलं कर्म झळाळणार आहे. सोनं जसं विस्तव आतून लख होऊन तावून-सुलाखून बाहेर पडतं आणि मग त्याला अमूल्य ता प्राप्त होते, तसंच झिजून, प्रसंगांना तोंड देऊन, आपलं सत्कर्म करत राहिलात, परमार्थ करत राहिलात तर, काय होणार आहे, ते पहिल्या वाक्यात सांगितल्याप्रमाणे.. देह गेला तरी माणसाची कीर्ती मागे राहणार आहे.

आपण येथे एक छान संकल्पना मांडू शकतो की, एक चांगलं लक्ष्यं, चांगल्या कारणांकरता मनात आणलं, त्यासाठी योग्य दिशेने, सज्जन मनाने, अत्यंत कठोर परिश्रम घेतले आणि आपलं कर्म म्हणजेच, काम करत राहिलात तर, आपल्या कामामुळे, यशामुळे समाजाला आपला फायदा होईल आणि आपली कीर्ती चिरकाल समाजात राहील.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.