नाटक ” अलबत्या गलबत्या -” धूम धमाल मनोरंजन “

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- बालनाट्याचा उपयोग हा व्यक्तिगत विकासासाठी चांगला होतो, सभाधीटपणा याच बरोबर आपल्यामधील कलागुणांना मिळणारा वाव आणि संधी हि बालनाट्यातून मिळते. मुलांना उत्साह, ऊर्जा आणि आनंद सुद्धा मिळतो तो वेगळाच असतो. सर्वसाधारणपणे 70 च्या दशकात बालनाटके भरात होती. त्यावेळी रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर, सुलभा देशपांडे यांनी लहान मुलांच्यासाठी विशेष परिश्रम घेऊन बालनाट्याची निर्मिती केली होती. त्यावेळी बालरंगभूमी बहरलेली होती तेंव्हा पासून अनेक कलाकार रंगभूमीवर आले, मुलांना नाटकाची आवड निर्माण होऊ लागली, व्यक्तिगत विकासासाठी नाटकाचा उपयोग होऊ लागला, बालनाट्यातून करमणूक, प्रबोधन दोन्ही मुलांना देण्यासाठी मदत होत होती. बालकांच्या बरोबर त्यांचे पालक, शिक्षक, सर्वजण नाटके पाहत असल्याने त्यांच्यामध्ये प्रेम-जिव्हाळा-करमणूक-प्रबोधन असे सारे सहजपणे होत होते. मुलांच्या विकासासाठी पालक त्यात रस घेऊ लागले होते, मुंबई, पुणे इत्यादी ठिकाणी बालरंगभूमीची वाटचाल होत असतानाच त्यातून अनेक कलाकार रंगभूमीला मिळाले.

” अलबत्या गलबत्या ” हे सत्तरच्या दशकात गाजलेलं बालनाटय, त्यावेळी चेटकिणीची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली होती, आज तेच नाटक अद्वैत थिएटर तर्फे निर्माते राहुल भंडारे यांनी रंगभूमीवर आणले असून झी मराठी ने हे नाटक सादर केलं आहे. लेखन रत्नाकर मतकरी आणि दिगदर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे.

बालनाट्य म्हंटल कि राजा, प्रधान, सेनापती, राजकन्या, ज्योतिषी, उंदीर, मांजर, बोके, कुत्रा, हि मंडळी असली कि मुलांना गंमत वाटते, अलबत्या गलबत्या मध्ये आहे एक राजा, तो आहे चक्रम आणि विचित्रपणे वागणारा, त्याचे प्रधान आणि सेनापती हे सुद्धा तसेच चक्रमपणा करण्यात हुशार, राजाला एक सुंदर राजकन्या असून तिचे लग्न करायचे असे ठरते आणि ज्योतिषाला बोलावले जाते तो सांगतो कि राजकन्येचा विवाह एका सर्वसामान्य अश्या अलबत्या गलबत्या बरोबर होईल, राजाला धडकी भरते, तो राजकन्येला नजरकैदेमध्ये ठेवतो.

अलबत्या गलबत्या ह्या सर्वसामान्य शिपायाची गाठ जंगलात चेटकिणीशी पडते, तिला एका गुहेतून एक जादूची आगपेटी हवी असते, अलबत्या तेथे जातो, हिरेमाणके, सोनेनाणे आणि आगपेटी आणतो, पण दुष्ट चेटकिणीचे कपट-कारस्थान त्याच्या लक्षांत येते, त्याला राजकन्या भेटते आणि पुढे काय ??? —- ते सारे बालनाट्यात पाहायला मजा येईल.

आजच्या काळाबरोबर जाईल, आजच्या मुलांना आपलीशी वाटेल अशी हि कथा सादर केली आहे. अनेक बदल त्यात आहेत, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग पुरेपूर करून घेतला आहे. बालनाट्य सादर करताना मुलांच्या भावविश्वाचा, त्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून रंजकता आणि अद्भुतपणा सारे काही उत्तम सादर केलं आहे. हे नाटक मुलांना खिळवून ठेवते. नाटकातील पात्र योजना योग्य अशीच आहे, अलबत्या च्या भूमिकेत सनीभूषण मुणगेकर हा धमाल करतो, त्याला साथ देणारे उंदीर, बोकोबा, भाटीबाई, कुत्रा, राजा, प्रधान, सेनापती हे सारे सागर सातपुते, दिलीप कराड, कुणाल धुमाळ, बाळकृष्ण वानखेडे, संदीप रेडकर, सायली बांदकर, ह्या कलाकारांची साथ छान लाभली आहे. राजकन्या श्रद्धा हांडे, ज्योतिषी दीपक कदम यांनी मजा आणली पण सर्वात मजा आणि धमाल आणली ती चेटकिणीच्या भूमिकेतील वैभव मांगले यांनी, ” कित्ती ग बाई मी हुश्शार ” हे पालुपद धमाल उडवते. वैभव मांगले नी हि भूमिका अप्रतिमपणे त्यातील सर्व बारकावे दाखवत सादर केली आहे. चेटकिणीची रंगभूषा / वेशभूषा उलेश खंदारे, महेश शेरला यांची आहे. मयुरेश माडगावकर यांचे संगीत सुरवातीपासूनच बालप्रेक्षकांचा ताबा मिळवते. संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य डोळ्यात भरते, आणि शीतल तळपदे यांची प्रकाश योजना डोळे दिपवते,

अलबत्या सनीभूषण मुणगेकर आणि चेटकीण वैभव मांगले हे धमाल करतात, दोघे लक्षांत राहतात, झी मराठी ने सादर केलेलं आणि अद्वैत थिएटर चे निर्माते राहुल भंडारे यांनी सादर केलेलं एक उत्तम रंगतदार बालनाटय धमाल उडवते. नाटक एक नंबरी सादरीकरण शंभर नंबरी असे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.