pimpri : आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून उलगडणार महाराष्ट्राच्या सौंदर्य आणि शक्तिपीठांची गुपिते

एमपीसी न्यूज – इनरव्हील क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इनक्रेडिबल महाराष्ट्र अँड इंडिया’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये विविध विषयाचे तज्ञ महाराष्ट्र आणि भारताच्या सौंदर्य आणि शक्तिपीठांची गुपिते उलगडणार आहेत. जगभरातून सुमारे 85 देशातील 175 विद्यार्थी चर्चासत्रामध्ये सहभाग घेणार आहेत. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि भारताची उज्वल प्रतिमा जगभरात आणखी प्रकर्षाने पोहोचणार आहे, अशी माहिती इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा अॅड. प्रतिभा जोशी यांनी दिली. 

पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या सचिव रेखा मित्रगोत्री, आयएसओ सोनाली जयंत, डिस्ट्रिक्ट ट्रेजरर मुक्ती पानसे, आरती मुळे, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्डच्या अध्यक्षा मनीषा कोंडसकर, आयएसओ डॉ. शोभा डॅनियल, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सोनिया रॉड्रिग्ज आदी उपस्थित होत्या.

लऊळे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सभागृहात शनिवार (दि. 18) रोजी ‘इनक्रेडिबल महाराष्ट्र अँड इंडिया’ हे चर्चासत्र सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पल्लवी शाह, चारु चिंचणकर, राज नहार, निखिल बल्लाळ आदी उपस्थित राहणार आहेत. विविध देशांमधील विद्यार्थी पुण्यातील नामांकित संस्थांमध्ये शिकण्यासाठी आले आहेत. त्यांना भारत आणि महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, त्यांचे जगात असलेले महत्व समजावे. भारतात शिकण्यासाठी आलेले हे विद्यार्थी जेंव्हा त्यांच्या मायदेशी परत जातील, तेंव्हा भारताची एक सकारात्मक प्रतिमा त्यांच्या मनात असेल, हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने यासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे.

चर्चासत्रामध्ये डॉ. उल्हास कोल्हटकर ‘भारत आणि महाराष्ट्रातील महिला’ या विषयवार बोलणार आहेत. ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या विषयावर डॉ. प्रकाश भिडे उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. पराग लिमये ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अज्ञात पैलू’ उलगडून सांगणार आहेत. ‘संपूर्ण मानवजातीला भारत देश देत असलेला संदेश’ नरेंद्र नायडू सांगणार आहेत. निनाद थत्ते ‘महाराष्ट्रातील किल्ले’ या विषयावर बोलतील. संगीता नागवंशी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या विषयवार बोलणार आहेत. प्रमोद जेजूरीकर देखील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.