Maval Lockdown News: तळेगाव, वडगाव, कामशेत व लोणावळ्यात 7 ते 12 मे दरम्यान कडकडीत लॉकडाऊन

एमपीसी न्यूज – मावळातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता येत्या 7 ते 12 मे दरम्यान तळेगाव, वडगाव, कामशेत व लोणावळ्यात कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील वाढती कोविड रुग्णसंख्या लक्षात घेता उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती सभागृह मावळ येथे प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

मावळचे प्रभारी तहसीलदार रावसाहेब चाटे, गट विकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, मावळ तालुका कोवीड समन्वयक डॉ. गुणेश बागडे तसेच तळेगाव, लोणावळा नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व वडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बैठकीस उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील नगरपालिका क्षेत्रात व ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये covid 19 चा वेगाने प्रसार होत आहे तसेच सद्यस्थितीत त्याठिकाणी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे, तेथील प्रसार रोखण्याच्या उद्देशाने लॉकडाउनच निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार लोणावळा नगरपालिका, वडगाव नगरपंचायत, तळेगाव नगरपालिका क्षेत्र व कामशेतमध्ये दि. 07 मे (शुक्रवार)च्या पहाटे 1 पासून ते दि. 12 मे (बुधवार)च्या रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात फक्त रुग्णालय सुविधा, औषध दुकाने चालू असतील व सकाळी 07 ते 9 या कालावधीत दूध वितरण सेवा चालू राहतील.

हा लॉकडाउन यशस्वी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय यंत्रणांना व पोलीस स्टेशन प्रमुख यांना याबाबतचे निर्देश दिले आहेत.

मावळ तालुक्यातील लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, समाजसेवी संघटना व नागरिकांनी देखील या काळात नियमांचे पालन करावे व यंत्रणेला सहकार्य करावे. जेणेकरून सर्वांच्या सहकार्याने कोविडचा वाढता प्रादुर्भाव आपल्याला रोखणे शक्य होईल, असे आवाहनही उपविभागीय अधिकारी जाधव यांनीकेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.