Maval news: अतिवृष्टीमुळे मावळातील 162 गावातील भात पिकाचे नुकसान; तत्काळ भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – अचानक आलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 22 हजार हेक्टरवर भात लागवड केली होती. तर 162 गावातील भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. भात जमिनीवर सपाट झाला आहे. याचे तातडीने पंचनामे करावेत. सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. बाधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील पाचाणे, पुसाणे,आढले,उर्से,या गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकाची खासदार बारणे यांनी आज (मंगळवारी) पहाणी केली. तसेच   शेतकऱ्यांच्या व्यथा समजून  घेऊन कृषी आधिकारी व तहसिलदार यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

मावळचे  तहसीलदार मधुसुधन बर्गे, कृषि आधिकारी रामचंद्र ढगे, बीडीओ सुधिर भागवत, शिवसेना तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, अमित कुंभार, चंद्रकांत भोते, राम सावंत, शांताराम भोते, पोपट राक्षे, शेतकरी, इतर आधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. या भागातील शेतकऱ्यांचे भात हे पारंपरिक पीक आहे. अचानक आलेल्या पावसामुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मावळ तालुक्यातील आंदर  मावळ, पवन मावळ, नाने मावळ या तीन विभागात भात शेतीचे प्रमाण जास्त आहे.  अतिवृष्टीमुळे डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह शेतात आला. पाणी साचून राहिले. शेतातील भात जमिनीवर लोळला आहे. शेतकऱ्यांचे हातातील पीक वाया गेले.

या बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती खासदार बारणे  यांनी  दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.