Maval : इतिहासप्रेमींच्या स्वागतासाठी तिकोणा सज्ज ! तिकोणागडाच्या पायऱ्यांची दुरुस्ती पूर्ण

17 फेब्रुवारी रोजी लोकार्पण

एमपीसी न्यूज- तिकोणा किल्ला म्हणजे तमाम शिवभक्त, दुर्गभटके, दुर्गसेवक यांचे आवडते स्थान. मात्र या गडाच्या पायऱ्या मोडकळीस आल्यामुळे, काही ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेल्यामुळे या गडावर जाणे अवघड झाले होते. इतिहासप्रेमींकडून या पायऱ्यांची दुरुस्ती करण्याची अनेकदा मागणी केली जात होती. अखेर शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्ग संवर्धन वडगाव मावळ या संस्थेच्या शिवभक्तांनी हे काम हाती घेण्याचा विडा उचलला. आणि पाहता पाहता पाच महिन्यात अहोरात्र काम करून मोडकळीस आलेल्या पायऱ्यांची दुरुस्ती केली. येत्या 17 फेब्रुवारी रोजी या पायऱ्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 10 लाख खर्च आला आहे.

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्ग संवर्धन या दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या कामासाठी विशेष मेहनत घेतली. पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय हे दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य नव्हते. त्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून पुरातत्व खात्याची रीतसर परवानगी घेतली. किल्ल्याच्या मूळ बांधकामाला जराही धक्का न लावता काम पूर्ण करण्याचे आव्हान होते. शिवाय या कामासाठी निधी उपलब्ध करण्याची मोठी जबाबदारी संस्थेच्या कार्यकर्त्यांसमोर उभी होती. पण म्हणतात ना ! तुम्ही चांगले काम हाती घ्या, तुम्हाला साथ देणारे अनेक हात पुढे येतील. त्याप्रमाणे या कामासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मोलाची मदत केली. त्याशिवाय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील स्वखर्चातून हे काम पूर्ण केले.

मे 2018 मध्ये या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. बांधकामासाठी लागणारे अवजड साहित्य गडावर नेण्याचे सर्वात मोठे आव्हान समोर उभे होते. त्यासाठी रोप वे उभा करण्यात आला. त्याच्या साहाय्याने बांधकामाचे साहित्य वर नेण्यात आले. हे सर्व काम चालू असतानाच पावसाळा जवळ आला. सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये पावसाळ्यात काम करणे अवघड म्हणून पावसाळा संपेपर्यंत विश्रांती घेण्यात आली.

सप्टेंबर 2018 मध्ये पुन्हा कामास सुरुवात करण्यात आली. पाच महिने अहोरात्र काम करून गडाच्या एकूण 42 पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली. ज्या ठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या होत्या त्याला धक्का न लावता, पुरातत्व खात्याचा नियम कुठेही पायदळी न तुडवता हे काम पूर्ण करण्यात आले.
येत्या १७ फेब्रुवारी रोजी या पायऱ्यांचे लोकार्पण केले जाणार असून सर्व इतिहासप्रेमी, गडकिल्ले भटकणारे, दुर्गप्रेमी यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.