Pimpri News : तडफदार नेतृत्व काळाने हिरावले; लक्ष्मणभाऊंना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे नेते आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Pimpri News)  मतदारसंघाच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असणारा लोकप्रतिनिधी हरपला. तडफदार नेतृत्व काळाने हिरावले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगताप यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे. आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी-चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत.

लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. (Pimpri News) पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Laxman Jagtap : आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन; भाजपचा हरहुन्नरी नेता हरपला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “लक्ष्मण जगताप हे एका आजाराशी लढत होते. मात्र आज त्यांचे निधन झाले आहे. ही आमच्या पक्षासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची आजाराशी झुंज सुरू होती. ते यातून बाहेर येतील असे वाटले होते, मात्र तसे झालं नाही. मी लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे.”

भाजपचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “पिंपरी-चिंचवडमधून तीन वेळा निवडून आलेले आमदार (Pimpri News) आणि माझे जवळचे सहकारी लक्ष्मण जगताप यांचं निधन खूपच धक्कादायक आहे. पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा लक्ष्मणजी वस्तुपाठ होते. बरे होतील असं वाटतानाच त्यांचं असं जाणं चटका लावणारं आहे. आम्ही सगळे जगताप कुटुंबासोबत आहोत. श्रद्धांजली! ओम शांती!”, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विट केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.