Moshi : चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिमेंट मिक्सर उलटला; चालक जखमी

एमपीसी न्यूज – आरएमसी मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून वळण घेताना मिक्सर उलटला . यामध्ये चालक जखमी झाला. हा अपघात आज, बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समिती मोशी येथे सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला.

नितीन बनसगुडे (वय 28) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अभिजित लुंकड यांच्या मालकीचा आरएमसी मिक्सर (एम एच 12 / के पी 6297) आहे. यावर नितीन बनसगुडे चालक म्हणून काम करतो. नितीन आज सकाळी साडेअकराच्या सुमारास पुणे नाशिक रस्त्याने आरएमसी मिक्सर घेऊन जात होता. मोशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळण घेत असताना मिक्सर वरील नियंत्रण सुटून मिक्सर रस्त्यावर उलटला. मिक्सर उलटल्याने सिमेंट आणि खडीचे मिश्रण रस्त्यावर सांडले. यामध्ये चालक नितीन याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

स्थानिक नागरिक प्रकाश बोराटे यांनी अग्निशमन विभागास याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच चिखली उपकेंद्राचे तानाजी चिंचवडे, श्रावण चिमटे, जयराम कदम, अनिल निकम, नवनाथ शिंदे, विक्रमसिंह कोरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.