Moshi News : मोशी येथील संभाजी महाराज यांच्या स्मारकाची जागा बदला ; संभाजी ब्रिगेडची मागणी

एमपीसी न्यूज – मोशी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्मारक साकारले जात आहे. मात्र, दोन्ही बाजूंना असलेल्या टोलेजंग इमारतींमुळे संभाजी महाराजांचा पुतळा पुर्ण झाकोळला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाची जागा बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे.

स्मारकासाठी निवडलेली जागा अपुरी आहे. स्मारकामध्ये उद्यान संग्रहालय, प्रसाधनगृह, गेस्ट हाऊस, वॉकींग ट्रॅक तसेच पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्कींग व्यवस्था, अशा अनेक सोयी सुविधा कराव्या लागणार आहेत. त्यासाठी ही जागा अपुरी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, सेक्टर क्रमांक पाचमधील उंच टेकडी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असून, ही जागा स्मारकासाठी निवडली जावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांच्या सह्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.