Mumbai : अनुप जलोटा जसलीनशी लग्नगाठ बांधणार ?

एमपीसी न्यूज : ‘ऐसी लागी लगन, मीरा हो गयी मगन’ म्हणता म्हणता भजनसम्राट अनुप जलोटा स्वत: आपल्या एका शिष्येत रमल्याची धक्कादायक माहिती ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोद्वारे प्रेक्षकांसमोर आली. यामुळे अनुप जलोटा जसलीनशी लग्नगाठ बांधणार की टीआरपीसाठी ही अफवा ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘बिग बॉस’या रिअॅलिटी शोच्या बाराव्या पर्वात अनुप जलोटा आणि जसलीन मथरु या गुरुशिष्याच्या जोडीने चांगलाच हंगामा उडवून दिला. मुख्य म्हणजे अनुप जलोटा यांनी त्यात सहभाग घेणे हेच मुळात धक्कादायक होते. त्याहून धक्कादायक गोष्ट ही होती, की गायिका व मॉडेल जसलीन मथरुशी त्यांचं नाव जोडलं गेलं. या दोघांच्या वयात ३७ वर्षांचं अंतर आहे.

अनुप जलोटा व जसलीन मथरु या जोडीने ‘बिग बॉस’ ला चांगलाच टीआरपी मिळवून दिला. या दोघांचं नातं केवळं पब्लिसिटी स्टंट होता असं म्हटलं जाऊ लागलं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. हे दोघं लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, आता खुद्द अनुप जलोटा यांनीच यावर स्पष्टीकरण दिलंय.

‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘जसलीनशी मी लग्न करणार ही माझ्यासाठीसुद्धा नवीन बातमी आहे. खरंतर मी आणि तिचे बाबा मिळून तिच्यासाठी चांगला वर शोधत आहोत. कॅनडामध्ये राहणाऱ्या एका पंजाबी मुलाचं स्थळसुद्धा मी त्यांना सांगितलं होतं. मात्र, अद्याप काही ठरलं नाही.’

जसलीन माझी शिष्या असून माझ्यासाठी ती मुली समान आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तिचं कन्यादानसुद्धा तेच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘बिग बॉस १२’च्या ग्रँड प्रिमिअरमध्ये जसलीन आणि अनुप जलोटा यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

गेल्या साडेतीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. ‘मला भेटण्यासाठी अनुप कोलकाताला यायचे आणि आम्ही लपूनछपून एकमेकांना भेटायचो. पण आता बिग बॉसच्या घरात आम्हाला एकत्र मुक्तपणे वावरता येणार आहे,’ असं देखील जसलीन म्हणाली होती. मात्र, हे सर्व नाट्य फक्त शो पुरतं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.