Wakad : मुंबई-बंगळुरु महामार्ग वाढणार; जागा भूसंपादनासाठी उद्यापासून शिबिर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून  जाणारा मुंबई-बंगळुरु महामार्ग 12 मीटरने वाढणार आहे. त्यासाठी जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. बाधितांना हस्तांतरणीय विकास अधिकार (टीडीआर), चटई निर्देशांक (एफसआय) च्या माध्यमातून परतावा देण्यात येणार आहे. आगाऊ ताबा घेण्यासाठी ‘अ’, ‘ब’ प्रपत्र भरुन घेण्याकरिता महापालिकेने उद्या गुरुवार आणि शुक्रवारी पुनावळेत (Wakad) शिबिराचे आयोजन केले आहे.

Bhosri : उसन्या पैशांसाठी तगादा लावला म्हणून तरुणाची आत्महत्या, दोघांवर गुन्हा दाखल

शहरातील किवळे ते वाकडदरम्यान बंगळुरु महामार्ग आहे. या रस्त्याच्या लगत असणारा 12 मीटर रस्ता विकसित करण्याची तयारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दर्शविली आहे. महापालिकेच्या विकास योजनेमधील जागा ताब्यात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, मामुर्डी, किवळे भागातून हा महामार्ग जातो.

12 मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याच्या भूसंपदानाची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बाधितांनी टीडीआर, एफसआयच्या  मोबदल्यात आगाऊ ताबा देण्यासाठी प्रपत्र ‘अ’, ‘ब’ च्या माध्यमातून महापालिकेकडे प्रकरण दाखल करावे.

जमीन मालकांकडून प्रस्ताव आल्यानंतर मंजूर एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार टीडीआर, एफएसआय देण्यात येईल. भूसंपादन कायद्याने निवाडा जाहीर झाल्यास टीडीआर, एफएसआयचा पर्याय जमीन मालकास उपलब्ध राहणार नाही. त्यानंतर केवळ भूसंपादन कायद्यानुसार मिळणारा रोख स्वरुपातील मोबदला देय राहणार आहे.

टीडीआरचा भाव बाजारामध्ये चांगला असून मागणीही चांगली आहे. त्यामुळे भुसंपादनाने मिळणा-या नुकसान भरपाईपेक्षा जास्त आर्थिक फायदा होवू शकतो. टीडीआरच्या माध्यमातून जागा ताब्यात देण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी  रस्ता रुंदीकरणाकरीता आवश्यक असलेल्या क्षेत्राचा ‘अ’ व ‘ब’ प्रपत्राच्या माध्यमातून आगाऊ ताबा देण्याची कार्यवाही करावी.

शिबिरात जमिनीची कागदपत्रे जागेवरच तपासली जातील. त्यानंतर टीडीआर, एफएसआय देण्यात येणार असल्याचे महापालिका नगररचना व विकास विभागाने सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.