Dehugaon : सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. तिसरीतील विद्यार्थ्यांनी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या संकल्पनेवर आधारित अनेकतेत एकतेचा संदेश देणारे बहारदार नृत्य सादर केले. चौथीतील सेजल पाटील व अर्णव चव्हाण यांनी स्वातंत्र्यदिनाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

Wakad : मुंबई-बंगळुरु महामार्ग वाढणार; जागा भूसंपादनासाठी उद्यापासून शिबिर

यावेळी नव्याने रुजू झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन अभंगच्या कुटुंबात स्वागत करण्यात आले.  येणारी भावी पिढी उमलण्याचं काम शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर आणि त्यांचा शिक्षकवृंद करीत आहेत.

अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांमधील उपजत गुण हेरून त्यांना पुढे नेऊन सुसंस्कृत करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परिश्रमांचं फलित म्हणजेच ही शाळा आहे, असे मत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले प्रसिद्ध ज्योतिषाचार्य,लेखक, विचारवंत  दत्तात्रय अत्रे यांनी यावेळी व्यक्त केले. शाळेतर्फे राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण, वाचन संस्कार, गाथा चिंतन, विचारवंतांची व्याख्याने  यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करण्यासाठी प्रेरणादायी ठरतात असेही ते म्हणाले.

विज्ञानयुग जरी आले असले तरी मुलांचं भावनिक नातं याठिकाणी जपलं जातं. मुलांचे चेहरे इथे वाचले जातात. त्यांच्या अडचणी इथे समजून घेतल्या जातात, हेच या शाळेचे वैशिष्ट्य आहे. Not to punish him but to correct him हा या शाळेचा नियम आहे. एखाद्याला शिक्षा करणे फार सोपे आहे पण त्याची चूक सुधारुन त्याला जागेवर आणणे, सुसंस्कृत करुन त्याच्या उपजत कलागुणांना वाव देण्याचं काम ही शाळा करत आहे.

मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्याला चौफेर ज्ञान देऊन त्याची ज्ञानाची भूक इथे भागविली जाते. शाळेच्या शिस्तबद्ध वाटचालीचे त्यांनी कौतुक केले. 2019 साली जो ज्ञानयज्ञ पेटविला गेला तो अखंड धगधगता राहून, या ज्ञानकुंडातील पुस्तकांची ही 1600 पाने जणू मी वाचत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावर्षीची ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ही संकल्पना वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेत राबविली जाणार आहे, याबाबत सर्वांचे कौतुक करत टी.एन.टी पॅकेजिंग कंपनीचे एमडी निनाद नेमाडे यांनी शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले.  ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ही संकल्पना राबविताना विद्यार्थी व पालक, पालक व शाळा, समाज, पर्यावरण, प्राणी या सगळ्यांशीच आपले सूर जुळून एका सुरेल गाण्याने सारे विश्व एकत्रित गुंफले जावे व भ्रष्टाचार, गरिबी, आरोग्य, बेरोजगारी यावर आपण मात करावी, असे विचार त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले. सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विश्वबंधुत्वाचा विचार मांडत उबंटू या शब्दाची व्याप्ती त्यांनी समर्पक कथेतून स्पष्ट केली. ध्वजारोहण समारंभास भागूजी काळोखे, देहू रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजय भसे, शांताराम हगवणे, संस्थेचे अध्यक्ष सुनील कंद, उपाध्यक्ष अशोक कंद व संचालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका रेखा जाधव,प्रियंका चव्हाण,  निकिता खरात यांनी केले. शोभना नायर यांनी आभारप्रदर्शन केले. शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी व पूर्वप्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक यावेळी उपस्थित होत्या. या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी पालक बहुसंख्येने होते.‍ स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.