Mumbai : दोन दिवसात जाहीर होणार विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षांचे वेळापत्रक

एमपीसी न्यूज – विद्यापीठ व इतर प्रलंबित परीक्षा कधी होणार? याबाबत नवीन माहिती समोर आली असून, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले‌ आहे.

राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सामंत म्हणाले, या समितीचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर केला जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल.

बैठकीत पदवी आणि पदव्युत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान तर सीईटी 20 ते 30 जुलै दरम्यान घेऊन या परीक्षांचा निकाल 15 ऑगस्ट पर्यंत जाहीर करून 1 सप्टेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्यात येईल का? तसेच लॉकडाऊनचा कालावधी विद्यार्थ्यांसाठी मानवी हजार दिवस म्हणून ग्राह्य धरण्यात यावा.

कॅरी फॉरवर्ड योजना लागू करून पुढील वर्गात प्रवेश देण्यात येईल आणि शेवटच्या वर्षाची परीक्षा घेण्यात यावी. एम.फिल व पी.एचडी चा मौखिकी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून घेण्यात येऊन या विद्यार्थ्यांचा लघुशोधप्रबंध आणि प्रबंध सादर करावयाची मुदत निघून गेली असल्यास त्यांना मुदतवाढ देण्यात येईल का यावर सविस्तर चर्चा करण्यात आली परंतु राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सामंत यांनी संगितले.

सीईटी घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने सर्व उपाययोजना करून आपले वेळापत्रक तयार करावे.असेही सामंत यांनी सांगितले आहे.

या व्हिडिओ कॉन्फरन्सला उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ तसेच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.