Pune : विधान परिषदेसाठी पुण्यातून काँग्रेसतर्फे बागवे, छाजेड, बागुल यांच्या नावाची चर्चा

एमपीसी न्यूज – येत्या 21 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड आणि माजी उपमहापौर, नगरसेवक आबा बागुल यांच्याही नावाची चर्चा आहे. तर, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांच्याही नावाचा विचार सुरू आहे.

बागुल हे मागील 30 वर्षांपासून पुणे महापालिकेचे नगरसेवक आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आक्रमक आणि अभ्यासू भाषणे करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ गेल्या 35 वर्षांपासून आरक्षित होता. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविता आली नाही

. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बागुल इच्छुक असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे आता पूर्वीचेच उमेदवार पुन्हा देण्यापेक्षा पक्षाशी एकनिष्ठ आणि सच्चा काँग्रेस कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी पुण्यातून होत आहे.

बागुल यांनी विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीकडे कळविले आहे. त्यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणेही झाले आहे. तसेच माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनीही पक्षाची बांधणी, कार्यकर्त्यांचे संघटन करण्यावर भर दिला आहे.

राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला पुण्यात ताकद देण्याची मागणी करण्यात येत आहे. बागवे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कॅन्टोन्मेंट मतदारसंघात अतिशय कमी मतांनी पराभव झाला. ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधून पक्षांतर झाले. त्याचा फटका बागवे यांना बसला होता.

तर, ऍड. अभय छाजेड यांनीही पक्षासाठी चांगले काम केले आहे. निष्ठावंत व अभ्यासपूर्ण कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. काँग्रेसची भूमिका सातत्याने ते मांडतात. सर्व कार्यक्रमांनाही ते जातीने उपस्थित असतात. त्यामुळे त्यांनीही विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

येत्या निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे 5, तर भाजपचे 4 सदस्य विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात. सध्या कोरोनाचे महाभयंकर संकट असल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. २१ मे रोजी 9 जागांसाठी मतदान होणार आहे.

त्यासाठी ४ मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल. ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, १२ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून १४ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २१ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.