Nigdi : निगडीतील टँकर दुर्घटनेवर नियंत्रण मिळविणाऱ्या साहसी वीरांचा महापालिकेतर्फे सन्मान

एमपीसी न्यूज : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Nigdi) निगडी उड्डाणपुलावर रविवारी पहाटे गॅस वाहतूक करणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर पलटी झाला होता. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. टँकरमध्ये जवळपास 18 टन एलपीजी गॅस भरला होता. यासाठी महापालिका अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस प्रशासन, भारत पेट्रोलियम कंपनी खासगी संस्थेचे तज्ञ आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्यामुळे जवळपास 18 तासांनी परिस्थिती पुर्वरत झाली. दुर्घटनेवर नियंत्रण मिळविणाऱ्या साहसी वीरांचा महापालिकेतर्फे सन्मान करण्यात आला.

आयुक्त शेखर सिंह यांनी नुकत्याच झालेल्या सभेमध्ये साहसी वीरांचा सत्कार केला. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येत असताना टँकर चालवणाऱ्या चालकाचा ताबा सुटला आणि दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे उड्डाणपुलाच्या सुरूवातीला हा टँकर अपघातग्रस्त झाला होता.

टँकर पलटी झाल्यानंतर गॅसची गळती चालू होती. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, सतिश कसबे, अग्निशमन विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे व त्यांचे सहकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे तसेच पोलीस घटनास्थळी त्वरीत दाखल झाले.

यानंतर टँकरमधील गॅस लिकेज बंद करून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली. त्यामध्ये पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, बीपीएल कंपनीचे अधिकारी, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले आणि मोठा अपघात होण्यापासून टळला.

अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी त्वरित जाऊन धोकादायक परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अग्निशमन दलाची अग्निशामक वाहने घटनास्थळी तैनात करण्यात आली होती.

Sharad Pawar : समृद्धी महामार्गावर जे अपघातात मरतात, ते ‘देवेंद्र’वासी होतात..

सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, सतिश कसबे यांच्या (Nigdi) मार्गदर्शनाखाली निगडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी घटनास्थळी त्वरित जाऊन परिस्थितीची पाहणी केली. जखमी वाहन चालकास खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याचप्रमाणे त्यांनी वाहतूक पोलिसांच्या सहाय्याने देहूरोडहून पुण्याकडे जाणारी आणि निगडीहून देहूरोडकडे जाणारी वाहतूक अलिकडेच वळवून प्रसंगावधान राखले तसेच विद्युत वितरण कंपनीस तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सुचना दिल्या.

तसेच, अपघातग्रस्त परिसरात नागरिकांना ये-जा करण्यास मज्जाव केला, या कामगिरीबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अभियंता संतोष झोडगे यांनी माहिती मिळताच त्वरित अपघातग्रस्त टँकरची गँस गळती विचारात घेऊन निगडी व आसपासच्या परिसरातील हजारो घरांचा वीजपुरवठा तात्काळ खंडित केला. त्यांच्या प्रसंगावधानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

भारत पेट्रोलियम कंपनी लिमीटेडचे आरोग्य सुरक्षा व्यवस्थापक किरण सिनकर यांनी शिक्रापूर येथून त्वरित येऊन अपघातग्रस्त टँकरमधील गँस त्वरित दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये भरण्याचे काम केले. तसेच या कामी त्यांनी कंपनीची आपतकालीन व्यवस्था यंत्रणा वापरून परिस्थिती आटोक्यात आणली, याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

अपघातग्रस्त मदत संस्थेचे धनंजय गीद तसेच हनीप गर्देकर यांनी खोपोली येथून येऊन अपघातग्रस्त टँकरमधील गँस गळती थांबविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. अशा प्रकारच्या गंभीर घटनांचा प्रदीर्घ अनुभव असलेले धनंजय यांनी जोखीम पत्करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

आकाश क्रेन सर्विस निगडीचे आकाश शीरसाठ यांनी धोकादायक परिस्थितीत गँस गळती होत असलेला अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्याने सरळ केला त्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले. निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर तसेच व्यापारी संघटनेचे सुरेश चौधरी, पप्पू दासानी, अफसर मुलाणी, भरत गारगोटे, जगदीश चौधरी, विकास सुभेदार, राजू
काळभोर, अनिकेत काळभोर, सचिन शिंदे, रफिक शेख या सर्वांनी घटनास्थळी मदत करून दुकाने बंद करणे, नागरिकांना प्रतिबंध करणे यासाठी मदत केली.

तसेच परिसरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आयुक्त शेखर सिंह यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.