Pune : वंचिताना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक राजू इनामदार यांचे मत

वंचित विकासतर्फे 'आपुलकी पुरस्कार' प्रदान

एमपीसी न्यूज – “सामाजिक काम करताना लोकांच्या मनातल्या गोष्टी आपण जाणून घ्यायला हव्यात. समाजातील दुर्लक्षित घटकांना, वंचितांना सक्षम करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण सर्वानी पुढाकार घ्यायला हवा,” असे मत सामाजिक कार्यकर्ते अझीम उर्फ राजू इनामदार यांनी व्यक्त केले.

जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेतर्फे कै. सुचिता सुरेश नाईक यांच्या स्मरणार्थ राजू इनामदार यांना ‘आपुलकी पुरस्कार’ देऊन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते जयंत नातू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त डॉ. दत्ता कोहिनकर, सौ. स्वाती नातू, वंचित विकासचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका मीना कुर्लेकर व सुनीता जोगळेकर, डॉ. मधुसूदन घाणेकर, मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ आदी उपस्थित होते.

राजू इनामदार म्हणाले, “वंचित विकास संस्थेप्रमाणेच आम्हीही वंचितांसाठी काम करतो. हा पुरस्कार म्हणजे आपल्या लोकांकडून मिळालेली कौतुकाची थाप आहे. अदृश्य स्वरूपाच्या कामांकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. परंतु वंचित विकासने या गोष्टी जाणल्याबद्दल संस्थेचा आभारी आहे. काम करत असताना अनेक अडचणी येतात. परंतु यात लोकांचा सहभाग आणि मदत पाहून पुन्हा नवीन उर्मी मिळते. माणसाने मनाची नाती निर्माण करायला हवीत. बोललेले सगळ्यांनाच ऐकू येते. मात्र, न बोललेलेही आपल्याला ऐकता आले पाहिजे.”

जयंत नातू म्हणाले, “पाठीवर मिळालेली शाबासकी ही कार्यकर्त्याच्या दृष्टीने खूप महत्वाची असते. कुठलेही पाठबळ नसताना समाजातील विविध घटकांना आवश्यक वस्तू पुरवून त्यांना मदत करणे त्यांच्यासाठी काम करुन त्यांना सक्षम बनविण्याचे महत्वपूर्ण काम राजू इनामदार करत आहेत. ही कौतुकाची बाब आहे.”

डॉ. दत्ता कोहिनकर म्हणाले, “कोणतेही काम करण्यासाठी आर्थिक भांडवल खूप महत्वाचे आहे. म्हणूनच प्रत्येकाने सामाजिक कार्यात सहभाग घ्यायला हवा जमेल तेवढी मदत करायला हवी. निस्वार्थीपणे केलेल्या कामाला संस्थेने पुरस्काराच्या माध्यमातून कौतुकाची थाप मिळाली आहे.”

प्रास्ताविक मीनाताई कुर्लेकर यांनी केले. सूत्रसंचलन व आभार देवयानी गोंगले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.