Nashik News : शहरात बससेवा सुरू करा; ‘झटका’ची पालकमंत्र्यांकडे मागणी

ऑनलाइन मोहिमेतून नाशिककरांचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीसीन्यूज : शहरात बससेवा सुरू व्हावी म्हणून 2018  पासून महानगरपालिका प्रयत्नशील आहे. झटका या राज्यातील वायूप्रदूषणावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेने नाशिक शहरात या संदर्भात ऑनलाइन सह्यांची मोहीम राबवली. या मोहिमेत नाशिककरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पालकमंत्र्यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

याबाबत संघटनेचे प्रतिनिधी रोशन केदार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने सर्व पूर्तता करून फेब्रुवारी 2020 मध्ये अहवाल पाठवला आहे. मात्र, राज्य परिवहन विभागाकडून शहर बससेवा सुरु करण्यासाठीचे परमिट अद्याप प्राप्त झालेले नाही. यासाठी नाशिक महापालिकेने तीनवेळा स्मरणपत्रे पाठवूनही यावर काम न होणे म्हणजे नाशिकरांच्या प्रतिक्षेचा अंत पाहण्यासारखे आहे.

महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांनी तसेच काही नगरसेवकांनी BS6 बसऐवजी BS4 बस खरेदी करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. त्या सर्व पत्रांना महापालिकेने दिलेली उत्तरे पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. याच काळात अनेक राज्यात आणि शहरांत BS4 बसेस खरेदी केल्या गेल्या; कारण या सेवेसाठी २०१८ साली पहिल्यांदा निविदा काढल्या गेल्या तेव्हा BS6 बसेस उपलब्ध नव्हत्या.

महापालिकेने याबाबतचे स्पष्टीकरण आणि नगरसेवकांसोबत झालेला पत्रव्यवहार याचीही सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरीही प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून बससेवा सुरु करण्यात वेळ वाया घालवला जात आहे. उलट बससेवा उपलब्ध नसल्याने रस्यावर वाढलेल्या वाहनांमुळे येऊ घातलेल्या बसेसपेक्षा कितीतरी अधिक पटीने प्रदूषण होत असल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

मध्यंतरीच्या काळात नाशिक शहरात बस सेवा सुरु होणार, यात अत्याधुनिक कमी प्रदूषण करणाऱ्या सीएनजी आणि zero pollution इलेक्ट्रिक बसेस असतील, अशा आशयाच्या बातम्या नाशिककर गेली दोन वर्ष ऐकत आहेत. मोडकळीस आलेली शहर बससेवा, सहसा न परवडणारी रिक्षासेवा, पेट्रोल, डिझेलचे वाढते दर यामुळे मेटाकुटीस आलेल्या सामान्य नाशिककरांसाठी या सुखद बातम्या होत्या. मात्र, नाशिकरांच्या पदरी निराशाच पडली.

या बसेसची खरेदी, बस स्टॉप विकसित करण्याची कामे, वाहकांचे प्रशिक्षण आदी अनेक गोष्टींसाठीच्या प्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष देऊन लाखो नाशिककरांच्या रोजच्या जीवनाचा आधार होऊ शकणाऱ्या बससेवेला सुरु करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी पालकमंत्री भुजबळ यांना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.