Nashik: सागरमाथा कडून नाशिक जवळील प्रसिद्ध डांग्या सुळक्यावर यशस्वीपणे चढाई

एमपीसी न्यूज – सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने संस्थेच्या नवोदित गिर्यारोहकांकडून (Nashik)नाशिक जवळील प्रस्तरारोहणासाठी आव्हानात्मक अशा ‘डांग्या’ सुळक्यावर यशस्वी चढाई करण्यात आली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रविण हरपळे यांनी दिली.

दि 31 मार्च 2024 रोजी नाशिक जवळील आव्हानात्मक 200 फुट उंचीच्या डांग्या सुळक्यावर यशस्वीपणे चढाई करण्यात आली. यामध्ये मोहिमेचा नेता सत्यवान शिरसाट, उपनेता अनिल पवळे, प्रविण हरपळे, शरद पवळे, पांडुरंग शिंदे व अक्षय हत्ते यांनी सहभाग घेतला. सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या वतीने नवोदित गिर्यारोहक सदस्यांसाठी हि मोहिम पुर्ण केली.

सागरमाथा ची टिम सर्व सामुग्रीसह सकाळी ९ वा सुळक्याच्या पायथ्याशी पोहचले. निसर्ग देवतेचे व सुळक्याचे पूजन करून सकाळी १० वाजता चढाईस सुरूवात करण्यात आली. चढाईचे संपूर्ण तांत्रिक नियोजन सागरमाथा चा अनुभवी गिर्यारोहक सत्यवान शिरसाट याने केले.

सर्वप्रथम पांडुरंग शिंदे याने चढाईस सुरुवात केली त्यावेळी त्याचा सुरक्षा रोप (बिले) शरद पवळे देत होता. अंगावर येणारी खडी चढाई करत पांडुरंग याने मुक्त चढाई करत 60 फुटांवरील पहिले स्टेशन गाठले व त्यानंतर अक्षय याने पुढील चढाई सुरू केली. शरद व अक्षय दुसऱ्या स्टेशन पर्यंत यशस्वी चढाई करत पोहचले.

 

Loksabha Election 2024 : मतदानाच्या काळात कोणत्याही यात्रा, सुट्टी न करता मतदानाचा हक्क बजावा – डॉ. नीलम गोऱ्हे

यानंतर या चढाई मार्गातील खरी आव्हानात्मक श्रेणीतील अंगावर येणारी तिसऱ्या स्टेशन पर्यंतची कठीण चढाई अक्षय यांने आपल्या कौशल्यपुर्ण चढाईने सहजपणे पुर्ण करत 200 फुटांवरील शिखरमाथा सर्वप्रथम गाठला.अक्षय हत्ते याने शिखर माथ्यावरून यशाचा आनंद साजरा करत घोषणा दिल्या. यानंतर लगेचच पांडुरंग शिंदे, शरद पवळे व अनिल पवळे यांनी सुळक्याच्या माथ्यावर चढाई पुर्ण केली. चौघेही एकत्रित सुळक्याच्या माथ्यावर पोहचल्यानंतर सर्वांनी जल्लोष केला.

या मोहिमेचे नेतृत्व मोहिमेचे नेता सत्यवान शिरसाट यांनी केले व तांत्रिक नेतृत्व सागरमाथा चे अध्यक्ष प्रविण हरपळे यांनी केले. तसेच या मोहिमेसाठी नाशिक येथील नाशिक क्लायंबर्स आणि रेस्क्यू असोसिएशन चे दयानंद कोळी, प्रा. विकास लाटे सर यांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.