Navratri Special : स्त्रीशक्तीला प्रेरणा, हेच संगीताताईंचं कार्य

कुटुंब प्रबोधनाच्या वाटेवरील ‘ती’

एमपीसी न्यूज : आपली कुटुंब उत्तम हवी असतील, तर कुटुंबातील स्त्री सक्षम हवी. सक्षम स्त्री कुटुंब तर उत्तम (Navratri Special) चालवतेच, शिवाय सार्यात कुटुंबाला ती सुसंस्कारितही करू शकते. कुटुंब व्यवस्थेचं आणि कुटुंबातील महिलेचं महत्त्व ओळखून पोवाडे, कीर्तन, व्याख्यानं, लेखन अशा विविध माध्यमातून गेली अनेक वर्षं स्त्रीशक्तीचं जागरण करत असलेल्या प्रा. संगीताताई मावळे यांची नवरात्रीच्या निमित्तानं ही ओळख…


महिला सक्षम व्हाव्यात, निर्भय व्हाव्यात असं आपण नेहमीच ऐकतो. याबद्दलची चर्चा न करता गेली तीस वर्ष त्यासाठीची थेट कृती करत असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. संगीता हेमंतराजे मावळे. त्या शाहिरी पोवाड्यांचे कार्यक्रम करतात. नारदीय परंपरेतील कीर्तनही करतात. व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधनाचं त्यांचं कामही अनेक वर्षं सुरू आहे. त्या उत्तम लेखिकाही आहेत. वेगवेगळ्या सामाजिक कार्यातही संगीताताई नेहमीच आघाडीवर असतात. अध्यापनाच्या क्षेत्रातही त्यांचा लौकिक आहे.

शाहिरी पोवाडे काय किंवा कीर्तन काय, या दोन्ही प्रबोधनाच्या कला मानल्या जातात. या संपन्न कला आहेत. पोवाड्यांमधून शक्तीचं, तर कीर्तनातून भक्तीचं जागरण होतं. माध्यमं कितीही निर्माण झालेली असली, तरी जनमानसावर आजही शाहिरी पोवाड्यांचा, कीर्तनाचा खूप चांगला परिणाम होतो, असा संगीताताईंचा अनुभव आहे.

नेमका हाच धागा त्या पोवाड्यांमध्ये, कीर्तनात तसंच व्याख्यानात पकडतात आणि स्त्रीशक्तीचं तसंच संस्कारांचं महत्त्व खूप प्रभावीरीतीनं श्रोत्यांसमोर मांडतात. कुटुंबातील स्त्री कुटुंबाला कशाप्रकारे सक्षम करू शकते, हा विचार त्या राजमाता जिजाबाईंच्या पोवाड्यातून सादर करतात. शाहीररत्न, गुरुवर्य किसनराव हिंगे यांनी तयार केलेला हा पोवाडा आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, वीरांगना सरदार उमाबाई दाभाडे यांचंही जीवनचरित्र संगीताताई शाहिरी पोवाड्यांमधून सांगतात.

स्त्रीशक्तीचं महत्त्व सांगणारी ही सारी चरित्र आहेत. राजमाता जिजाऊंनी शिवबांवर जे संस्कार बालपणापासून केले, त्यातून (Navratri Special) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले. कुटुंबातील स्त्री मुलांवर जे संस्कार बालपणापासून करते, ते अत्यंत महत्त्वाचे असतात. हा विचार लोकांना नक्कीच पटतो, असा संगीताताईंचा अनुभव आहे. घरातील स्त्री पराक्रमी हवी, स्वाभिमानी हवी, संस्कार करणारी हवी, हा विचार मांडणं खूप आवश्यक आहे आणि तो पोवाड्यांमधून, कीर्तनांमधून मी मांडते, असं संगीताताई सांगतात. कुटुंबाच्या बांधणीत आईनं केलेल्या संस्कारांचं खूप महत्त्व आहे, हे आपण समाजामध्ये सांगत राहिलो, तर हा विचार नक्कीच चांगल्या प्रकारे स्वीकारला जातो, असाही त्यांचा अनुभव आहे.

संगीताताईंचा विवाह शाहीर हेमंतराजे मावळे यांच्याशी होईपर्यंत त्यांचा शाहिरीशी, कीर्तनकलेशी कधीही संबंध आलेला नव्हता. विवाहानंतर त्यांनी शाहीर किसनराव हिंगे आणि शाहीर हेमंतराजे यांच्याकडून शाहिरी कला आत्मसात केली. गेली तीस वर्ष त्या समाजप्रबोधनाचं, कुटुंबप्रबोधनाचं कार्य करत आहेत. संपूर्ण मावळे कुटुंबाचा ‘शाहिरी चौरंग’ हा कार्यक्रमही खूप प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह देशात त्याचे पाचशेहून अधिक प्रयोग झाले आहेत.

संस्कार अगदी सहजपणे कसे होतात, याचंही संगीताताई हे उत्तम उदाहरण आहे. डेक्कन इन्स्टिट्युट ऑफ कॉमर्स, इंदिरा (Navratri Special) कॉलेज ऑफ कॉमर्स येथे त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलं आणि पुण्यातील मॉर्डन महाविद्यालयात त्या अध्यापनाचं काम करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबाबत नेहमीच नकारात्मक चर्चा ऐकायला मिळते. संगीताताई मात्र असा निराशावादी सूर कधीच लावत नाहीत. त्यांचं आणि विद्यार्थ्यांचं नातं प्राध्यापिका आणि विद्यार्थी असं कधीच नसतं.

अध्यापनाच्या कामाबरोबरच त्या विद्यार्थ्यांबरोबर सातत्यानं संवादही साधतात. कारण या वयात त्यांना योग्य संस्कार मिळाले नाहीत, तर उद्या ही मुलं बिघडतील. त्यामुळे संस्कारांची पेरणी सतत व्हायला पाहिजे, ही त्यांच्या प्रत्येक कामामागील भूमिका असते. म्हणूनच महाविद्यालयातही त्यांना विद्यार्थी, विद्यार्थिनी ताई म्हणतात, कोणी आई म्हणतात, तर कोणी माई म्हणतात. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमधील नात्याचं हे उदाहरण आदर्श ठरावं असंच.

शाहिरीकलेचं जतन व्हावं, हा वारसा टिकून रहावा यासाठी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे दरवर्षी पुण्यात १४ एप्रिल ते १ जून या कालावधीत पोवाडे प्रशिक्षण वर्ग विनामूल्य आयोजित केला जातो. शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या संयोजनातून होणार्याि या उपक्रमात संगीताताईंची मोलाची साथ असते. या वर्गामुळे अनेक नवे युवा शाहीर तयार होत आहेत आणि ही मोठीच उपलब्धी आहे.

एक नक्की आहे की, प्रत्येक कुटुंबासाठी संस्कार महत्त्वाचे आहेत. त्यांचं माध्यम कधी व्याख्यानाचं असेल, कधी पोवाड्यांचं, तर कधी कीर्तनाचं. संस्कारांचं महत्त्व ओळखून आपली एक मैत्रिण खूप महत्त्वाचं काम करत आहे.

चला… आपणही असंच काहीतरी छान घडवण्याचा संकल्प करू या…

 – विश्व संवाद केंद्र

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.