NCP : अजित पवार गटातील चार लोकांमुळे राष्ट्रवादीची पालिकेतील सत्ता गेली, तिकडे गेलेले अनेकजण संपर्कात – रोहित पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये (NCP) पूर्वी एका नेत्याच्या पाठीमागे चार पाच लोक असायचे, हेच कोणाला नगरसेवक करायचे ते ठरवायचे, त्यांच्यामुळे शहरात पक्ष वाढला नाही. त्यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसची पालिकेतील सत्ता गेली. त्यामुळे तिकडे गेले ते बरे झाले, असे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. तिकडे गेलेले अनेकजण संपर्कात असून लवकरच परत येतील असेही ते म्हणाले.
कासारवाडीत झालेल्या पत्रकार परिषदेला शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, देवेंद्र तायडे, काशिनाथ नखाते, माधव पाटील आदी उपस्थित होते.
संघटना म्हणून खूप मोठी ताकद लावणार आहे. भाजपसोबत गेलेल्या गटाचे काय होणार हे त्यांनाच माहिती आहे. विचार महत्त्वाचा असतो. अनेकांशी बोलणे झाले आहे. तिकडे गेलेले इकडे आलेले बघायला मिळतील. तिकडे खिचडी झाली आहे. कोणाला कुठे उमेदवारी मिळेल याचा गोधळ आहे.
महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत असे सांगत आमदार रोहित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड स्वाभिमानी शहर आहे. शहराचा झपाट्याने विकास झाला आहे.
या शहराने सर्वांना सामावून घेतले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी एमटीडीसी आणली. या एमआयडीसीत शरद पवार यांनी कंपन्या आणल्या. त्यांच्या अडचणी सोडविल्या. हिंजवडी आयटीत पाच लाखापेक्षा जास्त लोक काम करतात.
हजारो कोटींची उलाढाल होत आहे. विकासाचा शहरातील नागरिकांना फायदा झाला. देशाच्या विविध भागातील हजारो लोक शहरात काम करत आहेत. त्यामुळेच आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत पिंपरी महापालिका होती.
शरद पवार केंद्रात मंत्री असताना शहरातील विकासासाठी जेएनआरयूएम अंतर्गत तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी दिला आहे. दूरदृष्टी ठेवून निधी दिला. त्यामुळेच शहरात प्रशस्त रस्ते,पूल झाले. त्यावेळी अजितदादा राष्ट्रवादीचे नेतृत्व करत होते. हा निधी त्यांनी योग्य पद्धतीने वापरला. मागच्या भाजपच्या पाच वर्षात कोणती मोठी विकास कामे झाली आहेत. ७० टक्के गुजरातच्या कंपनीला दिल्याचे दिसते. कोणत्याही कंपनीला काम द्या पण कामे पूर्ण झाली पाहिजेत.
फुटपाथवर सातत्याने खर्च केला. एकाच कामावर सातत्याने निधी दिला आहे. कचऱ्याचे योग्य नियोजन झाले नाही. डेंग्यूची साथ (NCP) पसरली आहे. चोवीस तास पाणी देण्याचे भाजपचे आश्वासन पूर्ण झाले नाही. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लोकांना घरे मिळाली नाहीत. योग्य पद्धतीने राबविली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निधी दिला नाही. राजकारण केले. त्यामुळे विकास खुंटला आहे. वाहतूक कोंडी होते. विकासाचे नियोजन केले नाही. केवळ राजकारण चालते. पवार साहेबांच्या विचाराखाली चालणारी राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम करणार आहे. कार्याध्यक्ष निवडण्यात येणार आहेत.
सर्वांना ताकद दिली जाणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च होवूनाही महिलांसाठी कोणतीही नवीन योजना आणली नाही.