Pimpri News : राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत यांचे नगरसेवकपद शाबूत

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर यांच्याबाबत विभागीय आयुक्तांनी दिलेला अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे शिलवंत यांच्या नगरसेवकपदाला काही धोका नाही. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती शिलवंत यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषेदमध्ये दिली.

राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर यांचे पती, दोन भाऊ संचालक असलेल्या एॅडीसन लाईफ सायन्स कंपनीने पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना कालावधीत 10 लाखांचे मास्क पुरविले. यामुळे महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप करत धर यांचे नगरसेवकपद तत्काळ रद्द करावे, अशी मागणी युवा सेनेचे जितेंद्र ननावरे यांनी केली होती. याबाबत त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. त्यावर नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्या विरोधातील तक्रारीबाबत विभागीय आयुक्तांनी 6 ऑगस्टपासून पुढील आठ आठवड्यात निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.

त्यावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मास्क खरेदी प्रक्रियेत शिलवंत यांचे पती कंपनीचे संचालक नसल्याचे सादर कागदपत्रांवरुन निदर्शनास येते तसेच 31 मार्च 21 रोजीच्या लेखापरीक्षण अहवालावरुन शिलवंत यांच्या पतीच्या नावे असलेल्या शेयर्स हस्तांतरित झाल्याचे कागदपत्रांवरुन निदर्शनास येते. ताळेबंद पत्रकावरुन शिलवंत, त्यांच्या पतीने कंपनीला दिर्घ मुदतीचे कर्ज दिल्याचे निदर्शनास येते. शिलवंत यांच्याकडूनही कंपनीस दीर्घ मुदतीत कर्ज दिल्याचे उपलब्ध कारणांवरुन दिसून येते. त्यामुळे शिलवंत यांना अनर्ह करावे असा निष्कर्ष त्यांनी दिला होता.

या निर्णयाला शिलवंत यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने विभागीय आयुक्तांचा निष्कर्ष रद्द केला. त्यामुळे शिलवंत यांचे नगरसेवपक शाबूत राहिले आहे. माझे पद रद्द करण्याचा आदेश कोणीही दिला नव्हता. विभागीय आयुक्तांनी पद रद्द केले नव्हते. विरोधकांनी खोटी कागदपत्रे देऊन कु-प्रसिद्धी मिळविल्याचे नगरसेविका शिलवंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.