New Delhi : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

एमपीसी न्यूज- देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (वय 67) यांचे आज दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटू हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

जेटली यांना श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. परंतु मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता.

पहिल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प त्यांना मांडता आला नव्हता. त्यांच्याऐवजी पियूष गोयल यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्रीपदाबरोबरच संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.