Ravet : नवीन बंधारा बांधण्याच्या खर्चातून रावेत बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम

जलसंपदा विभागाला देणार दहा लाख रूपये

एमपीसी न्यूज – रावेत येथील बंधा-यातील टप्पा एक ते चार मधील गाळ काढण्याचे काम दापोडी येथील जलसंपदा यांत्रिकी विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे दहा लाख रूपये खर्च आला आहे. हा खर्च ‘रावेत येथील जुन्या बंधा-याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधणे’ या कामाअंतर्गत उपलब्ध असलेल्या तरतूदीतून करण्यात येणार आहे.

पिंपरी – चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. नदीच्या पाण्याबरोबर नदीपात्रातून गाळ येऊन बंधा-याच्या ठिकाणी साचून राहतो. गाळ साचल्यामुळे बंधा-याजवळील साठवण क्षमता कमी होऊन पाण्याची पातळी कमी होते आणि जलउपसा करण्यास अडढळा निर्माण होऊन पाण्याचा विसर्ग कमी होतो. हा गाळ काढण्याकरिता दापोडी येथील जलसंपदा यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांना कामाची निविदा न मागविता आणि करारनामा न करता काम देण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी येणा-या 3 लाख 68 हजार रूपये खर्चासही मान्यता देण्यात आली. त्यानुसार, या विभागास कामाचे आदेश देण्यात आले.

टप्पा एक आणि दोनच्या पंप हाऊस जवळील नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे. यामुळे पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. याशिवाय टप्पा तीन आणि चार आणि रावेत बंधा-यातील गाळ काढल्यास तसेच अपस्ट्रीम साईडचा गाळ काढल्यास पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होईल, अशी शक्यता गृहित धरली. त्यामुळे हे काम करण्यासाठी दापोडी येथील जलसंपदा यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पाहणी करण्यास सांगितले. त्यांनी कामाची पाहणी करून हे काम करण्यासाठी यापूर्वीचा 3 लाख 68 हजार रूपये खर्च गृहित धरून एकूण 9 लाख 75 हजार रूपये खर्च 25 मार्च रोजीच्या पत्राद्वारे कळविला.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार हे गाळ काढण्याचे काम एप्रिल आणि मे महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत चांगली वाढ होऊन पाण्याच विसर्ग एकसारखा होत आहे. त्यानुसार, दापोडी येथील जलसंपदा यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रस्तावति केल्याप्रमाणे एकूण 9 लाख 75 हजार रूपयांपैकी यापूर्वीचा 3 लाख 68 हजार रूपये खर्च वगळून उर्वरीत 6 लाख 6 हजार रूपये त्यांना देण्यासाठी स्थायी समितीची कार्योत्तर मान्यता घेण्यात येणार आहे.

या कामाचा खर्च सन 2019-20 च्या अर्थसंकल्पातील ‘पाणीपुरवठा विशेष योजना निधी’ या लेखाशिर्षाअंतर्गत रावेत येथील जुन्या बंधा-याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधणे’ या कामाअंतर्गत उपलब्ध असलेल्या तरतूदीतून करणे शक्य आहे. त्यास स्थायी समिती सभेने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.