Nigdi : आवडत्या क्षेत्रात करिअर केल्यास विद्यार्थ्यांना हमखास यश – अनिल गुंजाळ

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांच्या हाती किमान बारावी पर्यंत मोबाईल फोन देण्यात येऊ नये. सध्याच्या काळात पालक व त्यांचे पाल्य यांच्यातील मैत्रीपूर्ण संवाद व मैत्रीपूर्ण वागणूक याची आवर्जून जपणूक करण्याची गरज आहे. आवडत्या क्षेत्रात करिअर केल्यास विद्यार्थ्यांना हमखास यश मिळले, असे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ यांनी केले.

निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी गौरव व किल्ले स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुंजाळ यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ नायर, कार्याध्यक्ष भास्कर रिकामे, ग्रंथालय अध्यक्ष सदाशिव रिकामे, ग्रंथालय कार्यवाह विवेक जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी गुंजाळ यांनी उपस्थित पाल्य, त्यांचे पालक व किल्ले स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थी यांना त्यांच्या करिअरबद्दल मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात अत्यावश्यक असेलेली गोष्ट म्हणजे पालक व त्यांचे पाल्य यांच्यातील मैत्रीपूर्ण संवाद व मैत्रीपूर्ण वागणूक याची आवर्जून जपणूक करण्याची गरज आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना किमान बारावीपर्यंत मोबाईल देऊ नये असे आवाहनही त्यांनी केली. याचबरोबर या गोष्टींचा मुलांच्या आयुष्यावर होणारा सकारात्मक परिणाम किती महत्वाचा आहे हे देखील त्यांनी विषद करून सांगितले.

या कार्यक्रमात दहावी, बारावी आणि उच्चशिक्षणातील पदवी अभ्यासक्रम व काही व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मंडळातर्फे गौरव करण्यात आला. प्रतिकूल परिस्थिती असून देखील वनवासी विद्यार्थी वसतिगृहात शिक्षण घेऊन उत्तम गुण संपादन करणाऱ्या मुलांचाही यावेळी गौरव करण्यात आला. एकूण 37 गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा यावेळी गौरव करण्यात आला. किल्ले बनवा स्पर्धेतील एकूण 23 सहभागी गटांपैकी दोन विविध गटांत 4 पारितोषिके प्रदान करण्यात आली.

किल्लेस्पर्धेतील सहभागी खुल्या गटामध्ये श्रुती साळुंके यांच्या गटाला तिकोना किल्ल्याची प्रतिकृती बनविण्यासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच द्वितीय पारितोषिक पवन कोचरेकर गटाला अजिंक्यतारा किल्ल्यासाठी देण्यात आले. बाल गटामध्ये वरुण बाळून्के गटाला विजयदुर्ग किल्ला प्रतीकृतीसाठी प्रथम व रुद्रप्रताप शिंदे गटाला सिंहगड किल्ल्याच्या प्रतीकृतीसाठी द्वितीय पारितोषिक देण्यात आले. किल्ले स्पर्धेचे परीक्षण विजय सातपुते, विनीत दाते, मनेश म्हस्के यांनी केले. विनीत दाते यांनी किल्ले बनवा स्पर्धेची माहिती दिली. मुक्ता चैतन्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय मनेश म्हस्के यांनी केला. मंजिरी श्रोत्री यांनी सूत्रसंचालन केले. तर, विश्वनाथ नायर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.