Nigdi: शरीरसुखाची मागणी करत महिलेला मारण्याची धमकी; ‘वायसीएमएच’च्या डॉक्टरवर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेला दूरध्वनी करुन शरीरसुखाची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयातील एका डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.16)निगडी येथे घडला.

डॉ. विनायक पाटील (रा. संत तुकारामनगर, पिंपरी)असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका 36 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी डॉ. पाटील हे पिंपरी, संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच्‌)रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. तर, फिर्यादी महिला घरकाम करतात.

डॉ. पाटील हा गेल्या काही दिवसांपासून फिर्यादी महिलेला फोन करुन त्रास देत होता. शुक्रवारी (दि. 16) रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास डॉ. पाटील याने फिर्यादी महिलेला फोन केला. महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच ‘माझ्या फ्लॅटवर ये, नाही आल्यास तुझी बदनामी करेन. तुला जीवे ठार मारीन अशी धमकी’ दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.