Pimpri: पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देणार हार्मोनिअम, तबला, ढोलकीचे शिक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिस-या शनिवारी आनंददायी शिक्षण अंतर्गत ‘गीत मंच’ उपक्रम राबविला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीने मंजुरी दिली आहे.

आनंददायी शिक्षण अंतर्गत गीत मंच उपक्रमात विद्यार्थ्यांकडून प्रार्थना, समूहगीत, पोवाडा, कथाकथन, स्फूर्तीगीते यासारख्या पारंपारिक गीतांचा सराव करुन घेतला जाणार आहे. यामध्ये, महापालिका शाळांमधील गायन क्षेत्रात जाधववाडी शाळेतील सुरेश मिसाळ व निवेदक क्षेत्रात शैलेजा गायकर, हार्मोनिअमध्ये पिंपळे निलख शाळेतील धर्मेद्र भांगे हे शिक्षक विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाचे धडे देणार आहेत.

शिक्षणातून मुलांना आनंद मिळाला पाहिजे. केवळ निरस अध्यापनातून विद्यार्थी घडणार नसून विद्यार्थ्यांचा शारिरीक, मानसिक, भावनिक विकास होणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात हार्मोनिअम, तबला, ढोलकी या साधनांचा वापर करुन विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेतला जाणार आहे.

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये टप्प्या-टप्प्याने कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. तसेच, शालेय कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही, या अटीवर शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे, असे शिक्षण समितीने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.