Nigdi News : मुलांमधील गुन्हेगारी भावना संपवण्यासाठी क्रीडा संजीवनी महत्वाची – डॉ. सागर कवडे

क्रीडा उपक्रमांतर्गत दिशा भरकटलेल्या मुलांना खेळाचे साहित्य वाटप

एमपीसी न्यूज – लहान मुलांमधील गुन्हेगारी भावना संपवायची असेल तर त्यांना क्रीडा संजीवनी देणे गरजेचे आहे. खेळातून त्यांच्यामध्ये सांघिक भावना निर्माण होते, असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी केले.

संकेत चोंदे, तेजस्विनी सवई, चोंदे स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला फुटबॉल साहित्य देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे, पोलीस निरीक्षक शंकर डामसे, गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार कपिलेश इगवे, प्रशिक्षक संदेश बोर्डे, राजीव भावसार, संपत निकम, भूषण लोहरे आदि उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून राबवत असलेल्या क्रीडा उपक्रमासाठी मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला हा प्रतिसाद कमी होता. दिवसेंदिवस मुलांचा प्रतिसाद वाढत आहे. आता सुमारे 100 पेक्षा अधिक मुले खेळण्यासाठी येतात. मुलांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण या माध्यमातून होत आहे. डॉ. सागर कवडे यासाठी मोलाचे मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांचे राज्यभर कौतुक होत आहे. भरकटलेल्या पिढीला चांगल्या मार्गाला लावण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत आहे.

डॉ. सागर कवडे म्हणाले, “लहान मुलांमध्ये खूप मोठी ऊर्जा असते. तिला योग्य दिशा दिली तर चांगले व्यक्तिमत्व घडते. मारामारी करून कारागृहात जाण्यापेक्षा चांगल्या संगतीत राहून खेळ खेळून उत्तम खेळाडू व्हा. संगत महत्वाची असते. लहान मुलांमधील गुन्हेगारी संपवायची असेल तर क्रीडाची संजीवनी महत्वाची आहे. तुम्ही दोन पावले चाललात तर आम्ही चार पावले तुमच्यासाठी चालू. ओटास्कीम सारख्या भागातील मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत.

निगडीचे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी सांगितले की, मागील अडीच महिन्यात ओटास्कीममध्ये केवळ एक शरीराविरुद्धचा गुन्हा दाखल आहे. तिथली गुन्हेगारी हळूहळू संपत आहे. हा चांगला उपक्रम असल्याचेही ते म्हणाले.

राजीव भावसार म्हणाले, “पोलीस आयुक्तांनी सुरू केलेला हा उपक्रम चांगला आहे. या उपक्रमासाठी खेळाचे साहित्य आयुक्तालायला देण्यात आले. मुलांनी खेळात चांगली कामगिरी करावी.”

फुटबॉलचा राष्ट्रीय खेळाडू प्रथमेश पाटील म्हणाला, “तीन वर्षांपासून मी फुटबॉल खेळत आहोत. आम्हाला सुरुवातीला साहित्य मिळाले नाही. पण त्यातूनही प्रॅक्टिस सुरू ठेवली. आता खेळाचे साहित्य व प्रशिक्षण मिळण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळत आहे. याचा आम्ही चांगला फायदा करून घेऊ.”कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.