Nigdi News : शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या चेतन परदेशीला संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक पुरस्कार

1600 मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केले प्रयत्न

एमपीसी न्यूज – शाळा बाह्य मुलांच्या शिक्षणासाठी काम करणा-या चेतन परदेशीला संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक पुरस्कार देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP), केंद्रिय युवा व क्रीडा मंत्रालय आणि भारत सरकारच्या सहयोगाने हा पुरस्कार दिला जातो. केंद्रिय युवा व किडा मंत्री किरण रिजीजू यांच्या वतीने चार डिसेंबर रोजी ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

‘एस फॉर स्कूल’ या उपक्रमाअंतर्गत चेतन परदेशी याने महाराष्ट्रातील 1600 हून अधिक शाळा बाह्य मुलांना शैक्षणिक मदत करून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले आहे. या कामाची दखल घेत चेतनला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

आर्थिक अडचण किंवा इतर कारणास्तव शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा शाळेत दाखल करणे यासह फिरते ग्रंथालय आणि मार्गदर्शकाची भेट असे उपक्रम चेतनने आपल्या टिम सोबत राबवले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांत त्यांच्या या कामाचा विस्तार झाला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जगभरात ‘देअर- वर्ल्ड-वर्ल्ड ॲट स्कूल’ हा उपक्रम सुरू आहे. याच उपक्रमाअंतर्गत चेतनने ‘एस फॉर स्कूल’ या संस्थेची स्थापना केली. काही मित्रांच्या सोबतीने चेतनने शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सामाविष्ट करण्याचा वसा घेतला.

त्यानुसार कामाला सुरूवात झाली आणि हळूहळू ही एक चळवळ बनली व महाराष्ट्रातील 14 ठिकाणी ती पोहचली. पुण्यातील मावळ भागात देखील त्यांनी काम केलं. तसेच राजस्थान आणि कर्नाटक राज्यातही ही चळवळ पोहचली. तिन्ही उपक्रमाअंतर्गत जवळपास 6000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्याचे चेतन परदेशीने सांगितले.

चेतन परदेशीने याने ‘एमपीसी न्यूजशी’ बोलताना सांगितले की, कोरोना काळात सर्वच ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. ऑनलाईन पद्धतीने दिलेले शिक्षण मुलांना कितपत कळालं आहे हे पाहण्यासाठी आम्ही स्वाध्याय पुस्तिका तयार केली. आणि त्या माध्यमातून मुलांच मुल्यमापन करण्याचा प्रयत्न केला.

आम्ही तीन प्रोजेक्ट वरती काम करतोय, ज्यामध्ये ‘ब्रिंग देम बॅक’ हा एक प्रोजेक्ट आहे. याअंतर्गत शाळा सोडलेल्या मुलांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात, आणि त्यासाठी हवी ती मदत केली जाते.

‘मोबाईल लायब्ररी’ हा दुसरा प्रोजेक्ट आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, शब्दसाठा वाढावा यासाठी मोबाईल लायब्ररीची संकल्पना तयार करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत इग्रजी व मराठी पुस्कांचे एक फिरते ग्रंथालय तयार करणयात आले आहे.

ते सहा महिन्याच्या काळासाठी एका शाळेत राहतं आणि नंतर ते दुस-या शाळेत नेले जाते. सध्या अशा 14 लायब्ररी महाराष्ट्रात कार्यरत आहेत. तिसरा प्रोजेक्ट आहे ‘मिट द मेंटर’ म्हणजेच मार्गदर्शकाची भेट. याअंतर्गत मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींची भेट घडवून त्यांना प्रत्यक्ष कामाची आणि कार्यपद्धतीची ओळख करून दिली जाते.

चेतन परदेशी आयटी अभियंता असून तो निगडीत राहतो. स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी संभाळत चेतन हे कार्य करतो. विशेषत: ग्रामीण भागातील मुलांसाठी आम्ही काम करतो असे चेतन सांगतो.

याकामासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता शालेय साहित्याच्या स्वरूपात मदत स्वीकारली जाते. शाळाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत दाखल करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचं चेतन सांगतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.