Nigdi : क्लीनरच्या डोक्यात काचेची बाटली फोडून ट्रक चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – ट्रकमध्ये आराम करत असलेल्या चालक आणि क्लीनरला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. क्लीनरच्या डोक्यात काचेची बाटली फोडून चालकाकडून 22 हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 11) पहाटे दीडच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे घडली.

अवतार मेजर सिंग (वय 40, रा. बोलेपुर, ता. खन्ना, जि. लुधियाना, पंजाब) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाच अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अवतार सिंग आणि त्यांचा सहचालक ट्रान्सपोर्टनगर येथे त्यांच्या ट्रकमध्ये (पी बी 10 / जी झेड 5913) आराम करत होते. रविवारी पहाटे दीडच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने ट्रकची काच फोडली. अवतार सिंग यांच्या तोंडावर कोयत्याच्या मुठीने मारले. यामध्ये त्यांचे दात पडले. तर सहचालक हरमित सिंग यांच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. टोळक्याने दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवून अवतार सिंग यांच्याकडून जबरदस्तीने 22 हजार रुपये चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.