Nigdi : भररस्त्यात महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून भररस्त्यात महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ओटास्कीम निगडी येथे मंगळवारी (दि. 27) रात्री घडली.

पूनम विजय वाघमारे (वय 34, रा. आम्रपाली सोसायटी, ओटास्कीम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कैलास विटकर, सीमा बेलसरे, विलास विटकर (तिघेही रा. आम्रपाली हाऊसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी), अनिल शिंदे यांचा दोन नंबरचा जावई (नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताचा सुमारास फिर्यादी पूनम आणि त्यांच्या बहिणीची मुलगी निशा या रेशनिंगचे सामान घेऊन घरी पायी येत होत्या. तेव्हा आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांना रस्त्यात अडविले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्याचे केस पकडून ओढले. तुझ्या नवऱ्यावर केस टाकली ती कमी नाही झाली का? लई नाचती का? असे म्हणून फिर्यादी यांच्या पोटात पाठीवर लाथा बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी पूनम यांच्या हातातील रेशनचे सामान रस्त्यावर फेकून दिले. आरोपींनी त्यांच्या जवळील प्लॅस्टिकच्या बाटलीतील पेट्रोल पूनम यांच्या अंगावर ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.