Pune : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा नाही – बाळासाहेब थोरात

एमपीसी न्यूज – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे लवकरच विलीनीकरण होणार असल्याचे सांगितले होते. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विचारणा केली असता, काँग्रेस – राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नसल्याचे त्यांनी आज सांगितले.

काँग्रेस भवन येथे आज सायंकाळी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते. मागील 2 महिन्यांपासून काँग्रेस – राष्ट्रवादी एकत्रपणे काम करीत आहे. आघाडी यशस्वी करून शिवसेना-भाजपला टार्गेट केले आहे, असेही ते म्हणाले. कोल्हापूर, सांगली, पुणे पूरग्रस्तांना महाराष्ट्र शासन विसरून गेले.केंद्राकडे 6 हजार 800 कोटींची मदत मागितली होती. पण दमडीही मिळाली नाही. इतर राज्यांना मदत मिळत असताना महाराष्ट्राला मदत का मिळत नाही? असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला.

पुणे स्मार्ट सिटीची घोषणा केली. 5 वर्षांत काय काम केले? शहरातील अनेक प्रकल्प रेंगाळले. 100 कोटी तरतूद केलेली पुरेशी नाही. 2017 साली बॉण्ड काढावे लागले. 5 वर्षांत पुण्याची दुरावस्था झाली. भाजप 220 जागा मिळविणार असल्याचे सांगत असले तरी आम्ही 160 पर्यंत जाण्याचा दावा थोरात यांनी यावेळी केला. भाजप 370 कलम वर जास्त भर देत आहे, आपण का बोलत नाही, अशी विचारणा केली असता, ही राज्याची निवडणूक आहे. येथे स्थानिक प्रश्न महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी, सोनिया गांधी प्रचारासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रवक्ते सचिन सावंत, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, ऍड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.