Talegaon : विविध परवानग्यांसाठी गणेश मंडळांना नगरपरिषद कार्यालयात एक खिडकी केंद्राची सुविधा उपलब्ध करून देणार

एमपीसी न्यूज – गणेश मंडळांना पोलीस, नगरपरिषद आणि विद्युत वितरण कंपनी यांच्या परवानग्या मिळविणे सुलभ जावे यासाठी नगरपरिषद कार्यालयात एक खिडकी केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा सर्व गणेश मंडळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पक्षप्रतोद सुशील सैदाणे यांनी केले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये स्वयंशिस्त असावी आणि नागरिकांनी संविधानाप्रमाणे वागले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. नगरसेवक अरुण माने, संदीप शेळके, एड. श्रीराम कुबेर, नगरसेविका शोभा भेगडे, नीता काळोखे, फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन, कलापिनीचे मुख्य विश्वस्त डॉ. अनंतराव परांजपे, तळेगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, संदीप पानसरे यांनीही महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले, सार्वजनिक उत्सव साजरे करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे कार्यकर्त्यांनी काटेकोर पालन करावे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या गणपती मंडळांनाच मंडप उभारण्याची परवानगी दिली जाईल. उभारण्यात येणारे मंडप सुरक्षित व मजबूत असावेत. मंडपामुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी त्याची बांधणी करावी. मंडळांना पुरविला जाणारा विद्युत पुरवठा हा संपूर्णतः सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये बेड राखीव करून घ्यावेत.

मंडळांच्या जवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. दिलेल्या सर्व सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील. सामाजिक सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करावा. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी वैभव आवारे, यांनीही मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.