Bhosari : केवळ भोसरीतीलच विकासकांना नोटीस का? – दत्ता साने 

आयुक्तांवर आर्थिक हितसंबंधाचा संशय; चौकशीची मागणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागाने केवळ भोसरीतील विकासकांनाच नोटीसा का बजाविल्या आहेत? यामध्ये कोणाचे तरी हितसंबंध गुंतल्याचा दाट संशय आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकासकांची कोंडी करुन त्यांच्याकडून वसुली सुरु करण्याची शक्यता आहे. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आला आहे. त्यात विरोधी पक्षनेते साने यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड वगळून केवळ भोसरीतील विकासकांना नोटीसा देण्याचा असा एकतर्फी निर्णय घेऊन आपण देखील या आर्थिक हितसंबंधामध्ये सहभागी असल्याचा दाट संशय आहे.

भोसरी मतदार संघातील किती विकासकांना नोटीस दिल्या आहेत. त्यांची नावे, पत्ते व नोटीसची प्रत देण्यात यावी. एकदा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्यानंतर तो कायद्यानुसार नंतर रद्द करता येतो का ?, ज्या विकसकांना नोटीस दिल्या आहेत. त्यांच्याबाबत सदनिकाधारकांनी महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत काय ?, केवळ भोसरीमध्येच नवीन गृहप्रकल्प चालू आहेत काय ? शहरातील अन्य भागातही गृहविकास प्रकल्प चालू आहेत. त्यांना नोटीस का दिलेल्या नाहीत त्यांची कारणे देण्यात यावीत ?, पूर्णत्वाचा दाखला सदर गृहप्रकल्प महापालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार बनविला आहे किंवा नाही याची खातरजमा करुन दिला जातो. मग बांधकाम पूर्णत्वाचा दाखला गृहप्रकल्पाची पाहणी न करताच दिला जातो का ? अशा विविध प्रश्न साने यांनी उपस्थित केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.