Pimpri : मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमदार महेशदादांना मुंबईतून बोलावणे

मंत्रीपद कोणाला मिळणार; उत्सुकता ताणली

एमपीसी न्यूज – राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांना आज (मंगळवारी) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत तातडीने बोलावून घेतले आहे. त्यानुसार आमदार लांडगे त्वरित मुंबईला रवाना झाले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामुळे आमदार लांडगे यांना मंत्रीपद मिळणार का? याची उत्सुकता ताणली गेली आहे.  

आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसात हा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात पिंपरी-चिंचवडमधून भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे या दोघांपैकी एकाची मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचे बोलते जात आहे.  त्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांना आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीने मुंबईला बोलविले आले आहे. त्यामुळे दादांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार का? याची जोरदार चर्चा भोसरीसह शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकी दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी भोसरीत मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांचा भाजप प्रवेश केला होता. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास शहराला ‘लाल’ दिवा दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सभेत दिले होते. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यामध्ये आमदार महेश लांडगे यांनी भोसरीतून सर्वाधिक भाजपचे नगरसेवक निवडून आणले आहेत. त्यामुळे आमदार लांडगे हे मंत्री होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.