PCMC : सातशे काेटींचा टप्पा पार, 4 लाख 21 हजार मालमत्ता धारकांनी भरला कर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन(PCMC) विभागाची दमदार कामगिरी सुरूच असून दहा महिन्यात तब्बल सातशे काेटी रूपयांचा टप्पा पार केला आहे.

उर्वरित दोन महिन्यात जास्तीत-जास्त कर वसूल करण्यासाठी (PCMC)विभागाने आता थकबाकीदारांच्या मालमत्ता जिथे सील करता येणे शक्य नाही त्या ठिकाणी जप्त’ करण्याचा प्रथमच मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी मालमत्ता जप्त हाेऊ नये, यासाठी त्वरित कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख 15 हजार मालमत्ता (PCMC)आहेत. यापैकी तब्बल 4 लाख 21 हजार मालमत्ता धारकांनी 716 कोटी 40 लाख रूपयांचा भरणा करून शहर विकासात याेगदान दिले आहे. त्याबद्दल पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी या जबाबदार आणि जागरूक करदात्यांचे मनस्वी आभार मानले आहेत.

 

जनजागृती, वारंवार आवाहन, जप्ती पूर्व नाेटीस, माेबाईलवर एसएमएस पाठवून थकबाकीदारांना कर भरण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही कर न भरणा-या मालमत्ता धारकांबाबत कठाेर पाऊले उचलण्यास कर संकलन विभागाने सुरूवात केली आहे.

 

शहरात थकबाकीदारांमध्ये रहिवाशी मालमत्तांची संख्या माेठी आहे. अशा मालमत्ता धारकांना पाच वेळा भेटी देऊन कर भरण्याबाबत सूचना केल्या, मालमत्ता जप्त हाेण्याचा इशारा दिला. त्यानंतरही थकबाकीदार नागरिक कर भरण्यास प्रतिसाद देत नाहीत.

 

वास्तविक मानवतेच्या दृष्टीकाेनातून रहिवाशी सदनिका महापालिका सील करत नाहीत. मात्र, आता यापुढे अशा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. मात्र ही जप्ती मालमत्ता सिल न करता किंवा कुठलीही जंगम मालमत्ता जप्त न करता केली जाणार आहे. त्यासाठी सदर मालमत्तेवर जप्ती अधिपत्र डकवले जात आहे. रहिवास करत असलेले थकबाकीदार आर्थिक क्षमता असूनही कुठल्याही पाठपुराव्याला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

 

अशा रहिवाशी मालमत्तांकडे जवळपास 300 कोटीच्या वर थकबाकी आहे. यापूर्वी बंद असलेल्या रहिवाशी सदनिका बंद असल्याने सील केल्या होत्या. गत वर्षी त्यांची संख्या 70 च्यावर होती. यावर्षी अशा जप्त केलेल्या मालमत्तांची संख्या 100 च्यावर गेली आहे आणि ही कारवाई 31 मार्चपर्यंत चालू राहणार आहे.

Pimple Gurav : रायझिंग स्टार एज्युकेशनच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने  
283 मालमत्ता जप्त; 98 मालमत्तांना अधिपत्र डकविले

वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या 17 झोनमधील तब्बल 283 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यापैकी 98 निवासी मालमत्तांना अधिपत्र डकविले आहे. यानंतरही थकीत कर न भरल्यास संबंधित मालमत्ता धारकांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करण्याचा इशारा कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

25 मालमत्तांच्या लिलावाची प्रकिया चालू

महापालिकेने थकबाकी असलेल्या 283 मालमत्ता जप्त केल्या आहेत. यामधील 98 मालमत्तांचे मूल्यांकन करण्यात येत आहे. त्यापैकी 25 मालमत्तांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यात या मालमत्तांचा जाहीर लिलाव लवकरच करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित मालमत्तांचे वेगाने मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

28 नळ कनेक्शन खंडीत

थकीत कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांचे महापालिकेच्या वतीने आता नळजोडणी तोडण्यासारखी नाईलाजाने कठोर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 25 मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत.

तंत्रज्ञानाचा खुबीने वापर; एका आठवड्यात 14 कोटी कर वसूल

शहरात 5 ते 50 हजार रूपयांची पाच ते दहा वर्षांपासून थकबाकी असलेल्या 1 लाखांच्यावर मिळकती आहेत. अशा मिळकत धारकांना कर संकलन विभागाच्या वतीने त्यांच्या मोबाईलवर थेट एसएमएसद्वारे जप्ती पूर्व नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच याबरोबरच त्याच लिंकमध्ये थकीत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे एका आठवड्यात तब्बल 13 ते 14 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे.

असा आला रूपया
असा आला कर
ऑनलाईन – 430 कोटी 48 लाख
विविध ॲप – 8 कोटी 93 लाख
रोख. – 96 कोटी 57 लाख
धनादेशाद्वारे – 88 कोटी 18 लाख
इडीसी- 8 कोटी 37 लाख
आरटीजीएस – 37 कोटी 47 लाख

वाकड झोनमध्ये सर्वाधिक कर भरणा-यांची संख्या

शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे 56 हजार मालमत्ता धारकांनी 110 कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. त्याखालोखाल थेरगाव, चिखली, भोसरी, सांगवी चिंचवड, मोशी झोनमध्ये कराचा भरणा झाला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त 6 हजार 12 मालमत्ता धारकांनी 15 कोटी 90 लाखांचा कर भरणा केला आहे.

जप्ती अधिपत्रांचे सूक्ष्म नियोजन

50 हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या 22 हजार मालमत्तांची जप्ती अधिपत्र काढण्यात आली आहेत. 8 हजार अधिपत्राची अंमलबजावणी केली आहे. उर्वरित 14 हजार अधिपत्रांची 31 मार्चपर्यंत शंभर टक्के अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सूक्ष्म नियोजन केले आहे. त्यानुसार प्रत्येक झोनला निवासी, बिगर निवासी किती जप्त्या करायच्या, नळजोड किती खंडित करायचे, यांचे दैनंदिन उदिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्याचबरोबर टेलिकाॅलिंग किती करायचे, यांचे नियोजन केले आहे. टेलिकाॅलिंगच्या माध्यमातून जवळपास दररोज चार हजार थकबाकीदारांना फोन केले जात आहेत. याचाही कर संकलन विभागाला मोठा फायदा होत आहे.

शहरात सध्या मालमत्ता कर नोंदणी अभियान सुरू आहे. त्यामध्ये साडे चार लाखापेक्षा जास्त मालमत्तांचे geo -sequencing करण्यात आले आहे. जवळपास 1 लाख मालमत्तांची अंतर्गत मोजणी आणि आवश्यक माहिती संकलित करण्यात आलेली आहे. महापालिका वेगवेगळे पर्यावरणपूरक उपक्रम राबवणाऱ्या सोसायट्या, महिला, दिव्यांग, माजी सैनिक यांना अनेक सवलती देत असते. या सवलती देण्यासाठी “पालिका आपल्या दारी” असे हे अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी स्वतःहून आपला तपशील पालिकेच्या भेट पथकाला पुरवावा जेणेकरून त्यांना कुठलाही अर्ज न करता, कार्यालयात हेलपाटे न मारता घर बसल्या या सवलती मिळणार आहेत. तेंव्हा हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व गृहनिर्माण सोसायट्या, मालमत्ताधारक यांनी सहकार्य करावे. तसेच थकबाकीदार यांनी आपला थकीत कर भरून जप्तीसारखी कटू कारवाई टाळावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी 12% कर उत्पन्न वाढ नोंदवणे 15व्या वित्त आयोगाच्या अनुदानासाठी आवश्यक आहे.
:- शेखर सिंह
आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नियमित मासिक बैठका घेऊन माझ्याकडून कर संकलन विभागाचा आढावा घेतला जातो. मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली यांचे एकात्मिकरण करण्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी एकाच वेळी भरणे शक्य होणार आहे. याचा नागरिकांना लाभ होईल. विभागाला आवश्यक असणारे एम एस एफ जवान, जप्ती वाहने आणि प्लंबर तातडीने उपलब्ध करून. देण्यात आलेले आहेत. बांधकाम परवानगी विभाग आणि कर संकलन विभाग यांचे एकात्मिकरण अंतिम टप्प्यात आलेले आहे. जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया वेगवान करण्यासाठी गवर्नमेंट व्हॅल्यूअर यांचे पॅनल नेमण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यामुळे जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया वेगवान होईल.
:- प्रदीप जांभळे पाटील
अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या निर्देशानुसार वसुली मोहीम ही अधिकाधिक तीव्र करण्यात येत आहे. सध्या कर संकलन मुख्य कार्यालयाकडून गुगल मिटच्या माध्यमातून रोजच्या रोज आढावा घेतला जातो आहे. मालमत्ता कर नोंदणी अभियान सुद्धा सध्या वेगाने चालू आहे. येत्या वर्षभरात सर्व मालमत्ता धारकांना सर्व सवलती, सुविधा घर बसल्या मिळतील अशा पद्धतीने माहिती संकलित करण्यात येत आहे. नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. यंदाही गतवर्षीपेक्षा अधिक वसुली करून नवा विक्रम नोंदवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
:- नीलेश देशमुख
सहायक आयुक्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.