PCMC: पदोन्नती मिळालेल्या उपअभियंत्यांच्या समुपदेशनाद्वारे करणार बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कनिष्ठ अभियंतापदावरुन (PCMC) उपअभियंतापदी पदोन्नती मिळालेल्या 17 अधिका-यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या केल्या जाणार आहेत. बांधकाम आणि स्थापत्य हे मलईदार विभाग मिळण्यासाठी अधिका-यांची धडपड असते. त्यामुळे प्रशासनाने समुपदेशनाचा मार्ग निवडल्याचे दिसते. आता प्रशासन केवळ समुपदेशनाचा फार्स करते की खरचं आजपर्यंत काम न केलेल्या विभागात बदल्या करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अभियंत्यांचा बांधकाम परवानगी, स्थापत्य विभाग मिळावा याकडे सर्वाधिक कल असतो. हे दोन्ही विभाग मलईदार मानले जातात. त्यामुळे या दोन्ही पैकी एका विभागात बदली होण्यासाठी अभियंते ‘फिल्डिंग’ लावतात. काही अभियंते अनेक वर्षांपासून याच विभागात कार्यरत आहेत. महापालिका प्रशासनाने 17 कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंता (स्थापत्य) पदी तीन महिन्यांपूर्वी पदोन्नती दिली आहे.

Pune : आंतर-जिल्हा फुटबॉल स्पर्धेत नाशिक, नांदेड, औरंगाबादचा विजय

बढती दिलेल्या या 17 अभियंत्यांना पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी उपअभियंत्यांची पदोन्नती समुपदेशनाद्वारे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी या 17 उपअभियंत्यांना उद्या (गुरुवारी) सकाळी 10 वाजता स्थायी समितीच्या सभागृहात बोलविले आहे. त्यामुळे आता प्रशासन या अभियंत्यांनी आजपर्यंत ज्या विभागात काम केले नसेल. त्याच विभागात त्यांच्या (PCMC) बदल्या करणार का? नगर रचना, पाणीपुरवठा विभागात पाठविणार का? की बांधकाम, स्थापत्य विभागात पाठविणार याकडे अधिकारी वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रशासन केवळ समुपदेशनाचा फार्स करते की खरच आजपर्यंत काम न केलेल्या विभागात बदल्या करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.