Pimple Saudagar : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागा – अजित पवार

एमपीसी न्यूज- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर गणरायांच्या आरतीसाठी गणेश विसर्जनाचा दिवस पिंपरीत घालवला. दिवसभरात पवार यांनी अनेक मंडळांना भेटी देऊन गणरायांचे दर्शन घेतले. पवार यांच्या शहरात येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नवचैतन्य प्राप्त झाले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोमाने कामाला लागा, अशा सूचना देखील पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, दापोडी येथून दुपारी तीन वाजता पवार यांनी गणेश मंडळाच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर भोसरी, चिखली, चिंचवड, निगडी, आकुर्डीगाव, चिंचवडगाव, रहाटणी, पिंपळेसौदागर, वाकड परिसरातील गणेश मंडळांना पवार यांनी भेटी दिल्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपत्री पुरस्कार विजेते शंकर काटे, नगरसेवक डब्बु आसवाणी, नगरसेविका शीतल काटे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे तसेच पिंपळे सौदागर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘महापालिकेने मागील पंधरा वर्षात अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविले. परंतु, अलिकडच्या काळात पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. प्रदूषण वाढले आहे. रोगराई पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गणराया सर्वांना निरोगी आरोग्य दे’ असेही मागणे पवार यांनी बाप्पांकडे केले आहे.

‘विधानसभा निवडणुकासाठी कामाला लागा’

नगरसेवक नाना काटे यांच्या गणेश मंडळाच्या गणरायांची आरती देखील पवार यांनी केली. शहरातले अनेक प्रश्न त्यांच्या कानावर या वेळी टाकण्यात आले. आता आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. पक्षवाढीसाठी कसोशिने कामाला लागा, अशा सूचना पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.