Pune : स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पैलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कमळ किंवा धनुष्यबाण किंवा घड्याळ कोणतेही बटण दाबा मत मोदींनाच जाणार हे नक्की ,‘अब की बार, महाराष्ट्रात ४५ पार’

एमपीसी न्यूज – ‘बूथचा कार्यकर्ता ते महापौर असा प्रवास करणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. त्यांना कुठला डाव कधी टाकायचा? हे सर्व माहिती आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर राजकीय स्वार्थासाठी आखाडे बदलणारे पैलवान टिकणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज  (Pune) येथे व्यक्त केला.

 

पुणे शहर-जिल्ह्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे ([Pune) बोलत होते.

या पदाधिकारी मेळाव्यास पालकमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, रुपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, आ. सुनील टिंगरे, आ. चेतन तुपे, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, महेश शिंदे, दीपक मानकर, धीरज घाटे, प्रमोद भानगिरे, अजय भोसले, परशुराम वाडेकर, लतीफ शेख, संजय माशिलकर, संजय सोनवणे, प्रकाश भालेराव, श्रीनाथ भीमाले, बालाजी पवार, राजेश पांडे, भारत नागद, संजय आल्हाट यांच्यासह महायुती आणि घटक पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज महात्मा फुले जयंतीनिमित्त सर्वांनी आदरांजली वाहिली.

 

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुरलीधर मोहोळ यांना गिरीश बापट यांचा वारसा पुढे चालवायचा आहे. माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गिरीश बापट मला मोठ्या भावासारखे होते. पुण्याचे प्रश्न ते मांडायचे. आता आपला खासदार पुण्यातून  दिल्लीला जाणार आहे. इथे भाऊ किंवा तात्या कोणी नाही, मुरलीधर अण्णाच निवडून येणार आहेत. आयोध्येतील रामलल्लासाठी पुण्यातून दोन धागे रामासाठी विणले, त्याची वस्त्र श्रीरामल्लांना परिधान केली गेली. आता मतांचे धागे आपल्याला विणायचे असून जिल्ह्यातील चारही उमेदवारांना दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचे आहे.

 

कोरोना काळात  पंतप्रधान मोदी देशात काम करत होते, आम्ही राज्यात काम करत होतो तर मुरलीधर मोहोळ यांनी चांगले पुण्यात काम केले पण काही जण फक्त फेसबुक लाइव्ह करत होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘आता हेच फेसबुकवाले मोदीजींवर टीका करत आहेत. मोदीजी त्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून ठीक, पण जर त्यांची वक्रदृष्टी फेसबुकवाल्यांकडे गेली तर तोंडाला फेस येईल. यावेळी आपल्याला प्रत्येक बूथ जिंकण्याचे उदिष्ट आहे. त्यातून आपण देशात ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार करू, थोडी जास्त मेहनत कार्यकर्त्त्यांनी घेतली तर राज्यात ४५च्याही पुढे जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित चारही मतदारसंघात काम केले पाहिजे. विधानसभेची ही रंगीत तालीम असल्याने कुणीही गहाळ राहू नका. समोरचा उमेदवार कमकुवत समजायचा नाही. सर्वांची एकजूट दाखवणे महत्वाचे आहे. सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांना जास्त काम करावे लागणार आहे. विकासावर मत मागायची. केलेल्या कामाच्या जोरावर मत मागायची आहेत. काही लाख कोटींची काम सुरू आहेत.

 

पुण्यातील वाहतूक कोडी सोडवण्यासाठी मेट्रो कात्रज, हडपसर, वाघोलीला नेतोय,त्यासाठी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असणे गरजेचे आहे. आपल्या सर्व उमेदवारांचे मताधिक्य वाढण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे टाळा, वादविवाद टाळा. गंमतीचा भाग नाही खरोखर नम्रतेने वागा. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. सामाजिक कार्यकर्ते, संघटना जोडून घ्या.त्यांना सोबत घ्या. मतदारांना श्री मोदीजींना मतदान करायचे आहे. जिल्ह्यात घड्याळ दोन ठिकाणी, धनुष्यबाण आणि कमळ ही तीन चिन्हं आहेत. त्या समोरचं बटण दाबलं तरी मत श्री मोदीजींना जाणार आहे असेही पुण्याच्या पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जर महायुतीला महाराष्ट्रात हरवू शकेल, तर तो कार्यकर्ताच हरवू शकेल. माझा फोटोच नाही, नावच नाही, असं नाही. मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात काम केले. त्यांचे सर्व कुटुंब रुग्णालयात दाखल असताना ते तेथून काम करत होते. एकेका जागेचा विचार करा. उध्दवजी गेले पण दादा आल्यामुळे मताधिक्य वाढून महायुतीचे उमेदवार जिंकणार हे लहान मुलही सांगेल.

 

उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मी महापौर झाल्यावर कोरोनाचे संकट आले आणि जगच थांबले पण त्या काळात काम करायची खरी संधी मला मिळाली. लोकांसाठी काय आणि कसे काम करायचे असते  ते मला या काळात काम करताना शिकायला मिळाले. पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील रस्ते-उड्डाणपूल, मेट्रोचा विस्तार ही सर्व कामे केवळ राज्यात आणि देशात असलेल्या विकासाच्या विचारांच्या सरकारमुळे शक्य होत आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याला हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी काही दिवस मेहनत करायची आहे. कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळसाठी नाही तर नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.