PCMC : रावेतमध्ये आरएमसी प्लँटमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

एमपीसी न्यूज – रावेतमध्ये (PCMC) सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मधोमध आरएमसी प्लँट असल्यामुळे रहिवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. तसेच, ध्वनिप्रदूषण आणि हवाप्रदूषणाचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे. महापालिकेने या आरएमसी  प्लँटवर कारवाई करत तो इतरत्र ठिकाणी हलवण्यास सांगावा किंवा लवकरात लवकर बंद करावा असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये रावेत, वाकड, किवळे, पुनावळे आदी भागांमध्ये गगनचुंबी इमारतीचे जाळे पसरत चालले आहे. या गगनचुंबी इमारती बांधण्याकरिता मोठ्या प्रमाणात सिमेंट लागते. हे सिमेंट बनविण्यासाठी बिल्डर स्वतःचेच आरएमसी प्लँट उभा करतात जेणेकरून त्यांच्या गृहनिर्माण संस्थेला लागणारे सिमेंट त्यांच्याच आरएमसी प्लँटमधून उपलब्ध होईल अशी व्यवस्था करतात.  असे आरएमसी  प्लँट मुख्यत्वेकरून रहिवाशी भागात नसायला पाहिजेत पण आजच्या काळात समाजातील वृद्ध, लहान मुले, तरुण मुले-मुली, अपंग आणि दुर्बल लोकांच्या राहणीमानाची तमा न बाळगता विकसक आणि ठेकेदार बिनधास्तपणे आरएमसी प्लँट रहिवाशी भागांत कार्यान्वित करतात असे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

रावेत (PCMC) हा पिंपरी-चिंचवड उपनगरात तीव्र गतीने विकसित होणारा भाग. या भागात नामांकित विकसकांच्या इमारती, आयटीयन्स लोकांची राहण्यासाठी दिली जाणारी पसंती, उत्तम दर्जाचे रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी,  हाकेच्या अंतरावर असलेला  मुंबई -पुणे द्रुतगती मार्ग , प्रसिद्ध शाळा व विद्यालये आहेत. तसेच, या ठिकाणी जवळजवळ  30 -40 हजार लोक अलीकडच्या काळात नोकरी आणि व्यवसायानिमित्त वास्तव्यास आलेले आहेत.

अशा या गजबजलेल्या रावेत भागात  गृहनिर्माण संस्थांच्या मधोमध आरएमसी प्लँट (संतोष ड्रीम्स गृहनिर्माण सोसायटी नजदीक)  उभा असून  ह्या आरएमसी प्लँटमुळे  रावेत मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या आरएमसी प्लँटमधून येणाऱ्या धुळीकणामुळे येथील रहिवाशांना श्वसनाचे आजार उद्भवू लागले आहेत. तसेच,  परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. सकाळी व्यायामाला जाणाऱ्या आबालवृद्धांना आणि  येथील रहिवाशांना तोंडाला रुमाल बांधून चालावे लागत आहे.

Tathawade : अखेर ताथवडे, मारुंजीमधील आरएमसी प्लॅन्ट बंद

रावेत परिसरातील रहिवाशांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडे हा आरएमसी प्रकल्प हटवावा म्हणून  काही दिवसांपूर्वी तक्रार केली आहे. महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने  सदर आरएमसी प्लँटची पाहणी करून  महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला पुढील कार्यवाही करण्यास सांगितले आहे परंतू महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने अजूनपर्यंत हा आरएमसी प्रकल्प बंद करण्यासाठी ठोस अशा उपाययोजना केल्या नाहीत असे नागरिकांचे म्हणणे आहे. जर  हा आरएमसी प्रकल्प लवकरात लवकर बंद केला नाही तर या परिसरातील नागरिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.