Pimpri: गेल्या चार वर्षात 16 हजार नळजोड वाढले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या चार वर्षात 15 हजार 769 विविध व्यासाचे नळजोड वाढले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील नळजोडांची संख्या एक लाख 22 हजार 220 वर पोहचली आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवण्यासाठी आणखीन 108 एमलडी जादा पाण्याची आवश्यकता आहे. 
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत होत होता. शहरात अनधिकृत नळजोडचे प्रमाण जास्त आहे. चुकीच्या पद्धतीने नळजोड केले आहेत. त्यामुळे 30 ते 40 टक्के पाण्याची गळती होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. शहराची लोकसंख्या वाढली. नळजोड देखील वाढले आहेत.
  • महापालिकेने अनिधकृत नळजोडचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये अंदाजे पाच हजार नागरिकांनी नळजोड अधिकृत केले आहेत. कडक उन्हाच्या बाष्पीभवनामुळे आणि पाण्याच्या होणा-या अतिवापरामुळे पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटू लागला आहे. महापालिकेने एक मार्च पासून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद केला आहे.

गेल्या चार वर्षात शहरातील नळजोडांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सन 2015-16 मध्ये 2289 नळजोड होते. या नळजोडावर 21 हजार 262 कुटुंबियांना पाणीपुरवठा होतो. सन 2016-17 मध्ये 2154 नळजोड झाले. 23 हजार 594 कुटुंबियांना पाणीपुरवठा केला जात होता. तर, सन 2017-18 मध्ये 2567 नळजोड होते. 31 हजार कुटुंबाला पाणीपुरवठा केला जात होता. 2018-19 मध्ये 8759 नळजोड झाले आहेत. त्यातून 45 हजार 960 कुटुंबाला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या चार वर्षात 15 हजार 769  नळजोड वाढले असून एक लाख 22 हजार 220 कुटुंबाला पाणीपुरवठा केला जातो.
  • महापालिका पवना धरणातून सन 2015 मध्ये 450 एमएलडी पाणी उचलत होती. आजमितीला महापालिका 480 एमएलडी पाणी उचलते. यामध्ये केवळ 30 एमएलडीने वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला हे पाणी पुरेशे होत नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते. वाढत्या लोकसंख्येला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी आणखीन 108 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये 80 एमएलडी पाण्याची तूट आहे. दरम्यान, कासारवाडी, दापोडीसह विविध झोपडपट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोड आहेत. तब्बल 40 टक्के पाणी गळती होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.
आगामी काळात आणखीन पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.