Pimpri : ताथवडेतील पाणीपुरवठ्याची कामे 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ताथवडे गावात पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत पाईपलाईन टाकण्याचे कामे सुरू असून 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, 20 टक्के काम अद्याप शिल्लक आहे. ही कामे 31 ऑगस्टपर्यंत मार्गी लावावीत, असे आदेश आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरमध्ये आयुक्‍त हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ताथवडे येथील पाणीपुरवठा योजनेबाबत नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी आयुक्‍तांनी योजनेचा आढावा घेतला. ताथवडे गावाचा विकास आराखडा 6 जानेवारी 2017 रोजी शासनाने मंजूर केला आहे. या मंजूर आराखड्यानुसार अद्यापही काही रस्ते मनपाच्या ताब्यात आले नाहीत. यामुळे तेथील उर्वरीत पाईपलाईन दुसरीकडे टाकावी लागणार आहे.

ताब्यात न आलेल्या रस्त्यातील शिल्लक पाईपलाईन सध्याचा प्रभाग क्रमांक 25 मधील निवासी भागात वितरण नलिका नसलेल्या ठिकाणी 31 ऑगस्टपर्यंत टाकून कामे पूर्ण करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत ताथवडे गावाची पाणीपुरवठा योजना राबविणे, पाईपलाईनच्या कामाची व्याप्ती कमी करणे व प्रभाग क्रमांक 25 मधील निवासी असलेल्या पण वितरण नलिका नसलेल्या ठिकाणी सदरची शिल्लक राहिलेली पाईपलाईन टाकणेसाठी महापालिका विधी समिती सभेपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.