Pimpri : जम्मू-काश्मीरमध्ये वर्षभरात पाच लाख पर्यटकांना नेण्याचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा संकल्प

महासंघातर्फे जम्मूमध्ये विष्णू महायागासह विविध महायज्ञांचे आयोजन

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने वर्षभरात पाच लाख प्रवाशांना जम्मू-काश्मीर दर्शनासाठी नेण्याचा संकल्प केला आहे. सशक्त व अखंड राष्ट्रनिर्मितीसाठी ब्राह्मण महासंघातर्फे जम्मूमध्ये भव्य विष्णू महायागासह विविध महायज्ञांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने देशभरातून लाखो समाजबांधव जम्मूमध्ये जमणार आहेत, अशी माहिती अ. भा. ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी दिली.

काश्मिरी पंडिताना जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तसेच भारताच्या नंदनवनात कायमस्वरूपी शांतता नांदावी म्हणून ऑक्टोबर महिन्यात विष्णू महायागाचे आयोजन जम्मू येथे केले जाणार आहे. त्यानंतर दर दोन-तीन महिन्यांच्या अंतराने वेगवेगळे महायज्ञ करण्याचे नियोजन आहे. या महायज्ञांच्या निमित्ताने त्या राज्यांमधील पर्यटनालाही गती मिळेल, असे अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर राज्याला विशिष्ट दर्जा प्रदान करणारे राज्यघटनेचे कलम 370 व 35अ काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे. त्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने यापूर्वीच स्वागत केले आहे. केवळ घटनेचे स्वागत करुन आपली जबाबदारी संपेल, असे महासंघ मानत नाही. आपल्याकडून जम्मू-काश्मीरमधील जनतेने शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न महासंघ करीत आहे. काश्मीरमध्ये सुव्यवस्थापन निर्माण करण्यास केवळ सरकारला शक्य नसून आपल्यासारखा सामाजिक संस्थांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या करिता पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करणार आहे. काश्मीर ही शारदा देवीची भूमी आहे. काश्मीरला भू वैकुंठ मानले जाते. भारताच्या दृष्टीने जम्मू काश्मीरमध्ये सुख, समाधान, स्थैर्य नांदणे आवश्यक आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.