Pimpri: खासदार बारणे यांचे ‘मी अनुभवलेली संसद’ हे पुस्तक म्हणजे संसदीय कामाजाचा लेखाजोखा – सुमित्रा महाजन

एमपीसी न्यूज – खासदार श्रीरंग बारणे यांचे लोकसभेतील कामकाज गौरवण्यासारखे आहे. त्यांच्या ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकामध्ये संसदीय कामकाजा बरोबरच इतरांनी देखील कामकाजाची प्रेरणा घ्यावी अशा सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे संसदीय कामाजाचा लेखाजोखा आहे असे गौरोद्वगार लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले.

खासदार श्रीरंग बारणे यांनी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि. 3) येथे महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहिर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना गटनेते आनंदराव अडसूळ, तेलंगना राष्ट्रसमिती पक्षाचे नेते जितेंद्र रेड्डी, विविध राज्यातील पक्षाचे खासदार तसेच महाराष्ट्रातील खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार बारणे यांच्या संसदेच्या अनुभवाविषयी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेली संसद’ या मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीचे प्रकाशन महाजन यांच्या हस्ते झाले.

श्रीरंग बारणे यांनी संसदीय कामकाजाची इत्यंभूत माहिती असलेले व त्यांना आलेले संसदेतील कामकाजाचे अनुभव त्यांनी गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेले कामकाजाच्या पाठपुराव्याविषयी इत्यंभूत माहिती असलेले पुस्तक लिहिले असून या पुस्तकामध्ये अनेक छायाचित्रा सहित दाखले दिले आहेत. या पुस्तकाला प्रस्तावना लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी दिली आहे. पुस्तकाच्या शुभ संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शुभसंदेश आहेत. याच बरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील 19 खासदारांनी आपल्या अनुभवाचा दाखला देत बारणे यांच्या कार्याचा गौरव या पुस्तकात केला आहे.

महाजन म्हणाल्या, “बारणे यांनी पुस्तकातून केंद्र सरकारच्या अनेक योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे करावी लागते याची मांडणी केली आहे. सर्व सामान्य जनतेमध्ये सध्या लोकसभेच्या कामकाजाविषयी होत असलेला गदारोळ पाहता नाराजी पसरते. या पुस्तकाच्या माध्यमातून इतर सदस्यांनीही बारणे यांचा चांगल्या कामाचा दाखला घ्यावा. बारणे हे सातत्याने विविध प्रश्नांच्याद्वारे संसदीय कामकाजामध्ये भाग घेतात कार्यकुशल खासदारामध्ये त्यांची गणना केली जाते”

अनंत गीते म्हणाले, ”बारणे यांची काम करण्याची लोकसभेतील धडपडही चळवळीतील तळमळीचा कार्यकर्ता अशी आहे. आजच्या प्रसंगी असलेली लोकसभा सदस्याची उपस्थिती ही बारणे यांनी संसदेत त्याच्या स्वभावानी जमा केलेला ठेवा आहे. बारणे यांचे काम मी लोकसभेबरोबर त्यांच्या मतदार संघात पहिले असून लोकसभेचा कामकाजामध्ये जेवढा त्यांचा सहभाग असतो. तेवढाच जनसंपर्क ही त्यांचा मतदार संघामध्ये तेवढाच आहे”.

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, बारणे यांनी याअगोदर ही तीन पुस्तके लिहिली असून महाराष्ट्रातील एक मराठी खासदार दिल्लीमधील त्यांच्या अनुभवलेल्या कामकाजाविषयी पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करतो. ही कदाचित पहिली घटना असावी. बारणे यांचा नम्र स्वभाव, प्रचंड लोकसंपर्क, थोड्या कालावधीत संसदेमध्ये मिळवलेला अनुभव या माध्यमातून दिल्ली येथे बारणे यांनी कार्यकुशल खासदार म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.