Pimpri: ‘बीव्हीजी’चे कर्मचारी करणार ‘कोरोना’ वार्डची स्वच्छता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘कोरोना वॉर्ड’च्या स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी आणि सुपरवायझर यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याना किमान वेतन कायद्यानुसार वेतन, तसेच आवश्यक मशिनरी, रसायने देण्यात येणार असून त्यासाठी दरमहा तेरा लाख रुपये खर्च येणार आहे.

‘कोरोना’ने संपूर्ण महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये थैमान घातले आहे. ‘कोरोना’चा प्रादूर्भाव रोखणे, तसेच त्याच्या विषाणूंना अटकाव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विविध रुग्णालयांमध्ये स्वतंत्र ‘कोरोना वार्ड’ तयार करण्यात आले आहेत. पिंपरीतील जिजामाता रुग्णालय आणि अजमेरा येथील महापालिका मालकीच्या इमारतीसह, भोसरीतील नवीन रुग्णालयामध्ये देखील ‘कोरोना वॉर्ड’ तयार करण्यात आले आहेत. या ‘कोरोना वॉर्ड’ची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे. या दैनंदिन साफसफाईच्या कामासाठी 45 कर्मचारी आणि 4 सुपरवायझर असे मनुष्यबळ आवश्यक आहे.

ते उपलब्ध करून देण्यासाठी मेसर्स भारत विकास ग्रुप ऑफ इंडिया (बीव्हीजी इंडीया) यांना महापालिकेतर्फे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार त्यांनी भोसरीतील नवीन रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या ‘कोरोना वॉर्ड’साठी 24 कर्मचारी आणि 1 सुपरवायझर 13 मार्चपासून उपलब्ध करून दिले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी ‘बीव्हीजी’शी करण्यात आलेल्या करारनाम्यानुसार एकूण 45 कर्मचारी आणि 4 सुपरवायझर असे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या सर्वांना साफसफाईच्या कामासाठी सद्याच्या किमान वेतन कायद्यानुसार 45 कर्मचा-यांना दरमहा 23 हजार 705 रुपये 68 पैसे नुसार 10 लाख 66 हजार 755 रुपये 60 पैसे, तर 4 सुपरवायझरना दरमहा 25 हजार 635 रुपये 25 पैसे प्रमाणे 1 लाख 2 हजार 542 रुपये, तसेच आवश्यक मशिनरी, रसायने आणि अन्य खर्च मिळून 1 लाख 19 हजार 316 रुपये, असा एकूण 12 लाख 88 हजार 614 रुपये इतका खर्च येणार आहे. हा खर्च ‘कोरोना वॉर्ड’ सुरू असेपर्यंत दरमहा केला जाणार आहे. हा खर्च वैद्यकीय विभागाकडील सन 2020-21 या वित्तीय वर्षतील वासीएम रुग्णालय आणि अन्य रुग्णालयाची साफसफाई या लेखाशिर्षावरील उपलब्ध तरतूदीतून केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.