Pimpri: साडेतीन लाख नागरिकांचे सर्वेक्षण, 910 जण ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये

एमपीसी न्यूज – परदेशातून प्रवास करुन पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या  910 जनांना ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये (वेगळ्या कक्षात) ठेवण्यात आले आहे.  या सर्वांनी किमान 14 दिवसासाठी किंवा आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. सूचनांचे पालन न करणाऱ्या होम क्वारंटाईनमधील नागरिकांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. पोलिसांमार्फत ताब्यात घेवून पुढील 28 दिवसांपर्यत संस्थात्मक विलगीकरण (क्वारंटाईनची )व्यवस्था केलेल्या ठिकाणी राहावे लागेल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. आजअखेर शहरातील  3 लाख 37 हजार 272 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नवीन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकूण 121 व्यक्तींचे कोरोनाकरीता घशातील द्रावां नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शहरातील कोरोना बाधित रुग्ण 12 असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालयांमधील ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या 244 कर्मचा-यांची क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन सर्वेक्षण करित आहेत. आजअखेर शहरातील  3 लाख 37 हजार 272 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले 910  जण ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये ठेवण्यात आले आहे. या रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेच्या 100 टीम कार्यन्वित आहेत.  होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या नागरिकांनी आपल्या शरीराच्या तापमानाची तपासणी घरातच करावी. त्याची नोंद ठेवावी. महापालिकेच्या तपासणी पथकाला माहिती देऊन आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

 

कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधून आलेल्या सर्व नागरिकांनी किमान 14 दिवस घरांमध्येच होम ‘क्वॉरनटाईन’ करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. जे नागरिक घरामध्ये राहणार नाहीत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.