Pimpri: राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष बदलणार ! विलास लांडे यांच्या नावाला पवारसाहेबांचा ‘ग्रीन सिग्नल’

अजितदादांचा होकार मिळताच होणार घोषणा

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – पिंपरी महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आत्तापासूनच संघटनेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहरात लक्ष घातले आहे. त्यानुसार शहराध्यक्ष बदलण्यात येणार असून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाला पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. अजितदादांचा सिग्नल मिळताच लांडे यांची शहराध्यपदी घोषणा होईल, असे पक्षातील खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. लांडे यांनी देखील संघटनेचे कामकाज जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पवारांचा बालेकिल्ला मानले जात होते. शरद पवार, अजित पवार यांनी शहराचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. मागील 15 वर्ष महापालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. 2017 च्या निवडणुकीत एकेकाळी अजितदादांचे कट्टर समर्थक असलेल्या लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी भाजपचे कमळ हाती घेत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकली. विकासकामे करुनही सत्ता गेल्याने अजित पवार यांनी सातत्याने नाराजी व्यक्त केली.

फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिकेची आगामी निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने पक्षाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. शहरातील कामकाजाची माहिती ते जाणून घेत असल्याचे पक्षाच्या पदाधिका-यांनी सांगितले. आता राज्यात भाजपची सत्ता नाही. महापालिकेची आगामी निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आशावादी झाली असून त्यादृष्टीने कामाला सुरुवात केली आहे.

भाजपचे शहराध्यक्षपद आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. आता राष्ट्रवादी देखील शहराध्यक्ष बदलणार आहे. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा बदल केला जात आहे. भाजपच्या तोडीस तोड शहराध्यक्ष दिला जाणार आहे. शहराध्यक्ष आक्रमक आणि अनुभवी असावा असा पक्षात सूर आहे. सत्ताधा-यांना अंगावर घेणारा शहराध्यक्ष असणे आवश्यक आहे. विलास लांडे त्या निकषात बसतात. शहरातील राजकारणाचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यांच्या नावाला शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

केवळ विधानसभा निवडणुकीत पक्षाचे चिन्ह घेतले नसल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार थोडेसे नाराज आहेत. परंतु, लांडे यांच्याशिवाय शहराध्यक्षपदासाठी दुसरा सक्षम पर्याय देखील पक्षासमोर नाही. त्यामुळे त्यांचा ग्रीन सिग्नल मिळताच लांडे यांच्या नावाची घोषणा होईल. मागील काही दिवसांपासून लांडे यांनी संघटनेच्या कामकाजाची माहिती जाणून घेण्यास देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, लांडे यांना ज्येष्ठ नेते आझम पानसरे, भाऊसाहेब भोईर यांची साथ मिळेल अशी अटकळ बांधली जात आहे.

विलासशेठ आणि महेशदादा यांच्यात पुन्हा होणार सामना

विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे आणि विलास लांडे या मामा-भाच्चे जावयामध्ये लढाई झाली. त्यामध्ये महेश लांडगे यांनी बाजी मारली. सुमारे 80 हजार मताच्या फरकाने लांडगे विजयी झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना बढती देत शहराध्यक्षपदाची धुरा दिली. महापालिका पुन्हा ताब्यात ठेवण्याचे लांडगे यांच्यासमोर आव्हान असणार आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद विलास लांडे यांच्याकडे सोपविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महापालिका पुन्हा ताब्यात घेणे लांडे यांच्या समोर पहिले मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा विलासशेठ आणि महेशदादा यांच्यात सामना होईल.

संजोग वाघेरे यांची पाच वर्षांची निष्प्रभ कारकीर्द

संजोग वाघेरे एप्रिल 2015 मध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष झाले. त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रवादीची महापालिकेतील सत्ता गेली. पक्ष संघटना खिळखिळी झाली. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचा पराभव झाल्याने वाघेरे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, पक्षाने तो स्वीकारला नाही. त्यांना जवळपास पाच वर्षाचा कालावधी मिळाला आहे. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बदलला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.